- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- Exclusive : छावणीचे विद्यादीप बालसुधारगृह जेलमध्ये रुपांतरीत कसे झाले?
Exclusive : छावणीचे विद्यादीप बालसुधारगृह जेलमध्ये रुपांतरीत कसे झाले?

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : वेगवेगळ्या कारणांवरून घर सोडलेल्या, एखाद्या गुन्ह्यात आढळलेल्या मुलींना छावणीतील विद्यादीप बालसुधारगृहात पोलीस आणून सोडतात. हे जेल नाही तर सुधारगृह आहे, इथे मुलींना पुरेशा सोयीसुविधा आणि त्यांच्यात सुधारणा होईल असे वातावरण असणे अपेक्षित असते. त्यासाठी वेळोवेळी बालकल्याण समितीने लक्ष देणे अपेक्षित असते. पण केवळ आम्ही काहीतरी करतो आहोत, […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : वेगवेगळ्या कारणांवरून घर सोडलेल्या, एखाद्या गुन्ह्यात आढळलेल्या मुलींना छावणीतील विद्यादीप बालसुधारगृहात पोलीस आणून सोडतात. हे जेल नाही तर सुधारगृह आहे, इथे मुलींना पुरेशा सोयीसुविधा आणि त्यांच्यात सुधारणा होईल असे वातावरण असणे अपेक्षित असते. त्यासाठी वेळोवेळी बालकल्याण समितीने लक्ष देणे अपेक्षित असते. पण केवळ आम्ही काहीतरी करतो आहोत, ही मानसिकता सरकारी यंत्रणेत झाली आहे. बालसुधारगृहातून ज्या मुली पळाल्या, त्या गुन्हेगार नव्हत्या, तरीही त्यांना एखाद्या गुन्हेगासारखी वागणूक दिली जात होती, मारहाण केली जात होती, असे मुलींच्याच चौकशीतून समोर येत आहे. अशावेळी बालकल्याण समिती काय करत होती, बालगृहातील वातावरण नेमके कसे आहे, याची आता सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे.
अल्पवय हे हुल्लड असते, त्या वयात काय चूक काय बरोबर हे कळत नाही. अशावेळी पालकांवर जास्त जबाबदारी असते, की आपले पाल्य योग्य मार्गावर कायम चालत राहील. पाल्याचा मार्ग चुकला तरी त्याला योग्य मार्गावर आणण्याची गरजही आपलीच असते. ती अशी जेलसारख्या सुधारगृहात छोटीशी साबण आठवडाभर पुरवते, पुरेशी टूथपेस्टही मिळत नाही त्याने दात घासते, कुठेतरी तोकड्या पांघरुणावर झोपते, कुणीतरी तिला दमदाटी करून मारहाण करते… हे विदारक दृश्य कोणताही पालक आपल्या पाल्याच्या बाबतीत विचारही करू शकत नाही. त्या अवस्थेत ९ मुली राहिल्या आणि त्यांच्यात आपण कशी काय चूक केली, ज्यामुळे ही शिक्षा मिळतेय, असा आक्रोश निर्माण होणे स्वाभाविक आहे.
ज्या मुली पळाल्या होत्या, त्यातील ५ जणींना प्रेम झाले होते, या प्रेमातून त्यांनी घरातून पलायन केले होते. प्रेम केलं हा गुन्हा आहे का, असा प्रश्न त्यांच्या हृदयात किती रणकंदन माजवत असेल हे समजून घेणारी यंत्रणा कुठे अस्तित्वात आहे? बसं घरातून पळून गेल्या, इज्जत मातीत मिळवली एवढाच विचार पालक करतात तेव्हा त्यांच्यातील बुरसटलेली मानसिकता समोर येते आणि खऱ्या अर्थाने गुन्हेगार ते ठरतात. कारण ती त्यांचीच मुलगी असते, जिला त्यांनी लाडाने लहानाचे मोठे केले असते, तिच्या प्रत्येक इच्छेसाठी त्यांनी रक्ताचे पाणी केलेले असते. मग एका चुकीमुळे ती शत्रू कशी होऊ शकते?
बालसुधारगृह आहे जेल नव्हे!
छावणीच्या विद्यादीप बालगृहाबद्दल यापूर्वीही अनेकदा तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र दरवेळी शासकीय अनास्था आणि यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे हे बालसुधारगृह जेलमध्ये परावर्तीत झाले आहे. ज्यांना बाहेरचं जगं कसं आहे हे नुकतंच कळू लागतं, त्यांना अशा सुधारगृहात आणल्यानंतर मिळणारी वागणूक जर इतकी भयंकर असेल तर शासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. ९ मुलींनी पलायन केल्यानंतर विधी सेवा प्राधिकरण गाठण्याचा प्रयत्न केला, अशावेळी सक्षम न्याय यंत्रणेने त्यांची हाक ऐकण्याची गरज आहे. त्या बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांना समोर आणले तर बदडून काढू, असा इशारा देतात, यावरून बाल कल्याण समितीचे कार्य नक्की कसे चालते याचीही चौकशी होण्याची गरज आहे. सुधारगृहातील कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि वागणूक याचाही सखोल तपास व्हायला हवा. आता कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांवर ही जबाबदारी आहे, की बालसुधारगृहात ते ज्या विश्वासाने मुली सोपवतात, तिथे त्यांना खरंच सुधारण्यासाठी वातावरण निर्मिती केली जाते, की गुन्हेगारासारखी वागणूक देऊन स्वतःच्याच जिवावर उदार केले जाते! यासंदर्भातील वृत्त Update : आधी बालगृहातील लाइट फोडून जखमा करून घेतल्या, नंतर दगड, चाकू, लोखंडी रॉड घेऊन रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्याने धावत होत्या ९ मुली!; छावणी ते जिल्हाकोर्ट-रेल्वेस्थानकादरम्यानचा थरारपट – chhatrapatisambhajinagarcitynews