- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- जागतिक पर्यावरण दिन विशेष स्टोरी : फुलंब्रीचे ‘पोफळा’ गाव ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम!;
जागतिक पर्यावरण दिन विशेष स्टोरी : फुलंब्रीचे ‘पोफळा’ गाव ठरले मराठवाड्यातील पहिले सौरऊर्जा ग्राम!; एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीचा पुढाकार, अवघे गाव आता सौरऊर्जेद्वारे विजेची गरज भागवते!!

छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हाही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. शासन त्यास चालना देत आहेच. या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करून फुलंब्री तालुक्यातील […]
छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : पर्यावरण संवर्धनाचा एक आयाम शून्य कार्बन उत्सर्जन हाही आहे. त्यासाठी अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिकाधिक होणे आवश्यक आहे. शासन त्यास चालना देत आहेच. या संकल्पनेचे महत्त्व जाणून आजच कृतिशील पावले उचलणाऱ्या संस्थाही आहेत. त्यापैकीच एक एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीस लि. या संस्थेने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा विनियोग करून फुलंब्री तालुक्यातील पोफळा हे गाव संपूर्ण सौरग्राम केले आहे. संपूर्ण गाव सौर ऊर्जाद्वारे आपली विजेची गरज भागवीत आहे. असे हे मराठवाड्यातील पहिलेच गाव ठरले आहे.



शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे. याअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९ प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. त्यातून १२ हजार ७२५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे, अशी माहिती महावितरणकडून प्राप्त झाली आहे. ‘महावितरण’ ने दिलेल्या आकडेवारीनुसार, वैजापूर तालुक्यातील लोणी येथील १० मेगावॅटच्या प्रकल्पातून लोणी, वाकला, चिकटगाव, नायगव्हाण, खरज, तलवाडा व बाभूळगावातील १६६५ कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथे ५ मेगावॅट प्रकल्पातून गेवराई गुंगी, रिधोरा देवी, कोलते टाकळी, धानोरा व निमखेडा गावातील ८५४ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील अन्वी उपकेंद्रांतर्गत रहिमाबाद येथील ५ मेगावॅट प्रकल्पातून रहिमाबाद व आसडीतील ९०० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा होत आहे.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील खोडेगाव उपकेंद्रांअंतर्गत जोडवाडीतील ४ मेगावॅटच्या प्रकल्पातून १ हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा होत आहे. वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून भायगाव गंगा, उंदीरवाडी, राजुरा, पाशापूर, राहेगाव, सोनवाडीच्या ५३७ कृषिपंपांना दिवसा वीज दिली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील ४ मेगावॅट प्रकल्पातून मंगरूळ, चांदापूर व पालोदच्या ८५० कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. धोंदलगाव (ता.वैजापूर) प्रकल्पातून धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील १७५३ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. वरखेडी (ता. फुलंब्री) प्रकल्पातून आळंद व बोरगावमधील ६५० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथील ५ मेगावॅट प्रकल्पातूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात आहे. जिल्ह्यात एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प येत्या मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होतील, असा विश्वास मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी व्यक्त केला आहे.