- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- EXCLUSIVE STORY : हॉटेल व्हिट्सवरून पालकमंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत!; १५० कोटींहून अधिक रुपया...
EXCLUSIVE STORY : हॉटेल व्हिट्सवरून पालकमंत्री संजय शिरसाट पुन्हा अडचणीत!; १५० कोटींहून अधिक रुपयांची प्रॉपर्टी अवघ्या ६४ कोटींत घेतली कशी?, खरेदी करणारी कंपनी सिद्धांत शिरसाट यांची!

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल व्हिट्सची (जुने वेदांत) २१ मे रोजी सातव्यांदा लिलाव प्रक्रिया होऊन एकूण ६४ कोटी ८२ लाख रुपयांत हॉटेल आणि लॉन विकले गेले. सर्वोच्च बोली मेसर्स सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाय कंपनीने लावली. ही कंपनी पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांची असल्याचे वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल व्हिट्सची (जुने वेदांत) २१ मे रोजी सातव्यांदा लिलाव प्रक्रिया होऊन एकूण ६४ कोटी ८२ लाख रुपयांत हॉटेल आणि लॉन विकले गेले. सर्वोच्च बोली मेसर्स सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट ॲण्ड सप्लाय कंपनीने लावली. ही कंपनी पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांची असल्याचे वृत्त आजच्या अंकात एका प्रसिद्ध दैनिकाने दिले आहे. हॉटेल व्हिट्सची मालमत्ता सध्याच्या बाजारमूल्यानुसार दीडशे कोटींची होती, तरीही प्रशासनाने किंमत अवघी ६४ कोटी दाखवून लिलाव केल्याने आता ही लिलाव प्रक्रिया वादात सापडली आहे. मंत्री शिरसाटांसाठी प्रशासनाने लिलावासाठी कमी किंमत दाखवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी एका महिलेने सिद्धांत यांच्यावर केलेल्या आरोपामुळे मंत्री शिरसाट अडचणीत आले होते, त्या महिलेने नंतर घुमजाव केल्यामुळे प्रकरण थंड झाले. त्यात आता विरोधकांनी हॉटेलच्या व्यवहारावरून त्यांना कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे.
-विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. लिलाव प्रक्रिया पूर्वनियोजित व विशिष्ट कंपनीस लाभ मिळावा या हेतूने राबविण्यात आली आहे. सन २०१२ मध्येच करण्यात आलेल्या अधिकृत मूल्यांकन अहवालानुसार या मालमत्तेची किंमत ११० कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
-ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले आहे, की सिद्धांत शिरसाट यांनी व्हिट्स हॉटेल अत्यल्प मूल्यावर आपल्या नावावर करून ताब्यात घेतली. ही संपूर्ण प्रॉपर्टी सिद्धांत शिरसाट यांनाच मिळावी यासाठी सरकारने लिलाव प्रक्रिया बेकायदेशीर राबवली. ६४ कोटी रुपयांना प्रॉपर्टी घेतली. हा आकडा लहान नाही. एका मंत्र्याच्या मुलाकडे ६४ कोटी आहेत. मूळ किमतीपेक्षा कमी पैशात ही प्रॉपर्टी त्यांना मिळावी म्हणून ही लिलाव प्रक्रिया बेकायदेशीरपणे राबवली. कोठून आले एवढे पैसे? कोणत्या टेंडरिंगमधून आले? कोणत्या दलालीतून आले? की एकनाथ शिंदेंनी दिले पैसे? अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
संजय शिरसाट यांनी आरोप फेटाळले…
दरम्यान, विरोधकांनी केलेल्या आरोपांवर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाष्य केले असून, हॉटेल लिलावाची सातवी वेळ होती. टक्केवारी घेणाऱ्यांनी मला बदनाम करू नये. रात्रीची उतरली नाही की असे प्रकार घडत असतात. ते रोज बडबड करतात. लोकांना त्यांची सवय झाली आहे. मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. हे सर्व रेकॉर्ड एसडीएमकडून मिळू शकते. लिलाव काही माझ्यासाठी झाला नाही. यापूर्वी देखील लिलाव झाला होता. मराठी माणूस व्यवसायात जात असताना त्याला पाठिंबा द्यायचा सोडून त्याच्यावर आरोप करता का, तुम्हाला लाज नाही वाटत का, तुमच्याकडे मनपाला जे दलाल होते त्यातील एकही मराठी नव्हता, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.