- Marathi News
- एक्सक्लुझिव्ह
- स्नॅपचॅटचे “भूत’ मानगुटीवर : वाढता स्वैराचार, पालकांनी लक्ष देण्याची गरज, गुन्ह्यांचे वाढते प्रकार
स्नॅपचॅटचे “भूत’ मानगुटीवर : वाढता स्वैराचार, पालकांनी लक्ष देण्याची गरज, गुन्ह्यांचे वाढते प्रकार

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्नॅपचॅटचे भूत आजघडीला अनेकांच्या मानगुटीवर बसले असून, अल्पवयीन मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेक जण स्नॅपचॅटचा वापर करताना दिसतात. या ॲपद्वारे समोरच्या व्यक्तीची ओळख स्पष्ट होत नसल्याने, मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी समोर येत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेतच, पण अनैतिक कामांसाठीही या ॲपचा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पालकांनी अलर्ट होण्याची […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : स्नॅपचॅटचे भूत आजघडीला अनेकांच्या मानगुटीवर बसले असून, अल्पवयीन मुलांपासून ते प्रौढांपर्यंत अनेक जण स्नॅपचॅटचा वापर करताना दिसतात. या ॲपद्वारे समोरच्या व्यक्तीची ओळख स्पष्ट होत नसल्याने, मोबाइल नंबर किंवा ई-मेल आयडी समोर येत नसल्याने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेतच, पण अनैतिक कामांसाठीही या ॲपचा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पालकांनी अलर्ट होण्याची गरज निर्माण झाली आहे.
सायबर चोरट्यांकडून स्नॅपचॅटद्वारे तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. सुंदर तरुणीचा डीपी पाहून तरुण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारत आहेत. हाय, हॅलो करत चॅटिंग सुरू झाल्यानंतर एकमेकांना फोटो पाठविले जात आहेत. याच फोटो आणि चॅटिंगच्या आधारे तरुणांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. अशाच प्रकारे एका तरुणाच्या बाबतीत घडला. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर तरुणाने सांगितले, की एका तरुणीने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. तिने बोलायला सुरुवात केली. प्रेमाच्या जाळ्यात ओढणारे मेसेज तिने पाठविल्यानंतर त्या तरुणाने तिलाही तसे मेसेज केले. महिनाभरानंतर एका पुरुषाचा त्याला थेट फोन आला. तू मेसेज पाठविलेल्या तरुणीचा मी पती बोलतोय. तुझ्यावर आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहे. तुझे सगळे चॅटिंग माझ्याकडे आहे. हे मिटवायचे असेल तर पैसे द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. यानंतर तरुणाने हा प्रकार त्याच्या मित्राच्या कानावर घातला तेव्हा हा सायबर फ्रॉड आहे. तू त्यांचे नंबर ब्लॉक कर, असा सल्ला मित्राने दिला. स्नॅपचॅटचा वापर अनैतिक कामांसाठीही वाढला आहे. व्हिडीओ कॉल सर्व्हिस, कॉलगर्ल नावाने हजारो खाती या ॲपवर सक्रीय आहेत. या जाळ्यात ओढलेल्या अनेक तरुणांना नंतर पश्चातापाची वेळ येत आहे.
एका सायबर तज्ज्ञाने सांगितले, की पती बाहेर गेल्यानंतर विरंगुळा म्हणून अनेक महिलांनी स्नॅपचॅटवर खाते उघडले आहे. पण या ॲपवर अनेक भामटे त्यांना जाळ्यात ओढायला टपूनच बसलेलेच असतात. त्यांना मेसेज करून जाळ्यात ओढण्याचे प्रकार करतात. मेसेज आपोआप डिलीट होण्याची असलेली सुविधा, प्रायव्हसी सेटींगमुळे सुरुवातीला कुणाच्या ही बाब लक्षात येत नसली तरी मोबाइलचा वाढलेला वापर पाहून शंका गडद होऊन अनेक संसार दुभंगण्याच्या वाटेवर येऊन ठेपत आहेत. वेळीच सावरले तर बरेच अन्यथा परिस्थिती आणखीनच बिकट होऊन जाते. अल्पवयीन मुली, कॉलेज तरुणी, गृहिणी प्रामुख्याने भामट्यांचे लक्ष्य असतात. यातून विवाहबाह्य संबंधांचा धोकाही वाढत चालला आहे.
एकतर वापरू नका, वापरायचेच तर काय काळजी घ्याल?
स्नॅपचॅट हे व्हाॅट्स ॲपसारखे आवश्यक ॲप नाही. ते मोबाइलमध्ये असले किंवा नसले तरी फरक पडत नाही. त्यामुळे हे ॲप वापरणे एकतर बंद करावे किंवा वापरायचेच असेल तर काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.
-अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नका.
-मोबाइलमध्ये सेव्ह असलेल्या नंबरच्याच ओळखीच्या रिक्वेस्ट गरज असेल तर स्वीकारा.
-अनोळखी खात्यातून आलेल्या मेसेजला प्रत्युत्तर देऊ नका.
-अनोळखी खात्यावरून आलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका.
-संवादादरम्यान कोणतीही वैयक्तीक माहिती देऊ नका.
-तुमचा संसार आणि करिअर हे आयुष्यात सर्वांत मोठ्या गोष्टी आहेत, त्याकडे दुर्लक्षून कोणाच्या बोलण्याने हुरळून जाऊन चुकीच्या मार्गाला जाऊ नका.
-कोणत्याही संकटात किंवा ब्लॅकमेलला बळी पडत असाल तर तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क करावा.