- Marathi News
- पॉलिटिक्स
- EXCLUSIVE : सिडको ते क्रांती चौक रॅली, ९ तास जालना रोड राहणार बंद, ५ लाख मराठे, सर्वांत पुढे महिला,
EXCLUSIVE : सिडको ते क्रांती चौक रॅली, ९ तास जालना रोड राहणार बंद, ५ लाख मराठे, सर्वांत पुढे महिला, ३ हजार पोलीस…. असे आहे मनोज जरांगेंच्या रॅलीचे भव्यदिव्य नियोजन

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरात दाखल होत आहे. त्यामुळे शनिवारी (१३ जुलै) ९ तास जालना रोड दोन्ही बाजूंनी बंद राहणार आहे. याच दिवशी सरकारला दिलेला अल्टिमेटमही संपत असल्याने जरांगे हे शहरात भूमिका स्पष्ट करणार आहेत. सिडको चौक ते क्रांती चौकादरम्यान मराठा […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली छत्रपती संभाजीनगरात दाखल होत आहे. त्यामुळे शनिवारी (१३ जुलै) ९ तास जालना रोड दोन्ही बाजूंनी बंद राहणार आहे. याच दिवशी सरकारला दिलेला अल्टिमेटमही संपत असल्याने जरांगे हे शहरात भूमिका स्पष्ट करणार आहेत. सिडको चौक ते क्रांती चौकादरम्यान मराठा बांधवांची महारॅली निघणार असून, सिडको चौकात वसंतराव नाईक पुतळ्यास अभिवादन करून सकाळी अकराला या रॅलीला प्रारंभ होईल. क्रांती चौकापर्यंत ४.३ कि.मी. पदयात्रेने जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले जाणार आहे. मनोज जरांगे यांच्या भाषणाने रॅलीचा समारोप होणार आहे.
४ पोलीस उपायुक्त, ४ सहायक आयुक्त, ९० पोलीस अधिकाऱ्यांसह ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. बाहेरूनदेखील वाहतूक पोलीस व बंदोबस्तासाठी पोलिसांची कुवक मागविण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त सुभाष भुजंग यांनी वाहनांच्या पार्किंगसाठी काही जागांची चाचपणी केली. अयोध्या मैदान, कर्णपुरा, कडा कार्यालय, जाधववाडी, गरवारे मैदान, बीड बायपासवरील जबिंदा मैदान या मैदानांची त्यांनी पाहणी केली.
रॅलीत सहभागी होणाऱ्या महिला, पुरुषांनी मौल्यवान वस्तू, दागिने बाळगू नयेत. मोबाइल काळजीपूर्वक वापरावा. झेंड्यांना स्टील पाइप नसावेत. ते कमी उंचीचे असावेत. कुणी हवेत फिरवू नये. नशेखोर सापडल्यास कायदा हातात घेऊ नये, अशा सूचना पोलीस विभागाकडून करण्यात आल्या. दामिनी पथकांसह महिला पोलिसांचे विशेष पथकही रॅलीत नियुक्त असणार आहे.
खुलताबाद, कन्नड येथून १५० ट्रॅक्टर, तर फुलंब्री येथून २०० बैलगाड्या येणार असल्याचे समन्वयकांकडून सांगण्यात आल्यानंतर बैलगाड्या शक्यतो टाळा. गर्दीत बैल उधळल्यास जखमी होण्याची शक्यता आहे, अशी सूचना पोलीस विभागाकडून करण्यात आली. शनिवारी ड्राय डे घोषित करावा, शाळा, महाविद्यालये बंद ठेवावीत, अशी मागणी समन्वयकांनी केली असता ड्राय डे, शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे पोलीस आयुक्तांकडून सांगण्यात आले.
२५० भोंगे लागणार…
समन्वयकांनी सांगितले, की ९ चौकांत चहा-नाष्टाची सोय करणार. २५० भोंगे, ५ हजार झेंडे, ७०० बॅनर, १३ स्वागत कमानी, ५ एलईडी लावण्यात येणार आहेत. १० बलून सोडणार. १० रुग्णवाहिका आणि १० तज्ज्ञ डॉक्टर तैनात असतील, असे रॅली समन्वयकांकडून सांगण्यात आले.