अयोध्येतील सोहळ्याविरोधात छत्रपती संभाजीनगरात गुप्त बैठक घेऊन रचला कट?; १४ जणांना UP एटीएसचे पाचारण

 
ats
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अयोध्येत राम मंदिराच्या उद्‌घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. प्रभू राम लल्ला २२ जानेवारीला त्यांच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. देशभर या सोहळ्याचा उत्‍साह असताना काही विघातक शक्‍तीही सक्रीय झाल्या असून, छत्रपती संभाजीनगरात या विघातक शक्‍तींची बैठक झाली. बैठकीत सोहळ्याच्या विरोधी कट रचण्यात आल्याचे पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे अलर्ट झालेल्या उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) छत्रपती संभाजीनगरात येऊन संशयितांची चौकशी केली. त्यांना नोटीस बजावून १५ ते १८ जानेवारीदरम्यान लखनौ एटीएसच्या मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे.
एकूण १४ जणांना एटीएसने नोटीस बजावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विशिष्ट समुदायाच्या एका संघटनेची गुप्त बैठक शहरात पार पडली. बैठकीत विरोधी कट रचण्यात आल्याचे तांत्रिक पुरावे तेलंगणा पोलिसांना मिळाले आहेत. अयोध्येतील धार्मिक स्थळाबद्दल कट असल्याने तातडीने त्यांनी उत्तरप्रदेश एटीएसला हे पुरावे पाठवले. या बैठकीत दहशतवादी संघटना इसिसचे समर्थनही करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य मोठे आहे. ही माहिती मिळताच उत्तरप्रदेश एटीएसने महाराष्ट्र एटीएसला अलर्ट केले. त्यानंतर हे उत्तरप्रदेशचे पथक नुकतेच शहरात येऊन गेले. त्यांनी संशयितांची चौकशी केली. त्यांना नोटीस बजावली. ३० डिसेंबरला ही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येते. मात्र संशयितांना अटक करून सखोल चौकशी करण्याची गरज असताना केवळ नोटीस देऊन हजर राहण्यास सांगितल्याने आश्चर्य व्यक्‍त होत आहे. 

Tags