SPOT REPORT : महिनाभर आरती करू नका म्हणे, दुसऱ्या दिवशी हजारो लोक एकवटले अन्‌ केली 'महाआरती', चालिसापठण... महाआरतीसाठी येणाऱ्यांवर समाजकंटकांची दगडफेक, तिघे जखमी

 
bajad

छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : चिकलठाण्यातील कामगार कॉलनीत हनुमान मंदिरात मंगळवारी नेहमीप्रमाणे आरती सुरू असताना टोळक्‍याने येऊन आता महिनाभर आरती करायची नाही, असे धमकावत धुडगूस घातला होता. महिला भाविकाला धक्काबुक्की करून दोन तरुणांना बेदम मारहाण केली होती. या घटनेमुळे मोठा तणाव निर्माण होऊन दोन समुदायांचे गट आमनेसामने आले होते. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करून तणाव कमी केला. सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले होते. समाजकंटकांच्या या कृत्‍याला उत्तर देण्यासाठी सकल हिंदू समाजाने बुधवारी (१३ मार्च) रात्री महाआरती केली. यावेळी हजारो लोक जमले होते. प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आरतीसाठी कामगार कॉलनीकडे येत असलेल्या काही तरुणांवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने तिघे जखमी झाले.

advt

या दगडफेकीची माहिती कळताच मंदिरातील तरुणांचा गट संतप्त झाला. त्यांनी जालना रस्त्यावर येत घोषणाबाजी करीत चक्काजाम केला. त्यामुळे परिसरात पुन्हा मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या जमावाला पांगवले. त्यामुळे अनुचित प्रकार टळला. अविनाश अंबादास बोंद्रे (वय १९), सागर बाबाजी बंजारे (वय १८), शुभम लक्ष्मण राठोड (१८, रा. मुकुंदनगर) अशी दगडफेकीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभमने पोलिसांना सांगितले, की तो मित्रांसह आरतीसाठी येत असताना दगडफेक झाली. त्यामुळे आम्ही पडलो व घाबरून जालना रस्त्याच्या दिशेने पळालो. आमच्यासोबत अनेक तरुण तेथेच दुचाकी सोडून आल्याचे त्याने सांगितले.

पहा व्हिडीओ :

पोलिसांकडून गुन्हे दाखल...
या प्रकरणात पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. यात रजनी गुप्ता, हरिलाल गुप्ता, कृष्णा नागे, राजू रोठे, रामसनई गुप्ता व इतरांना मारहाण झाल्याची तक्रार नागे यांनी दिली. त्‍यावरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी लैला नावाची महिला, शकील जैनोद्दीन शेख, अखिल जैनोद्दीन शेख, अनिस जैनोद्दीन, रफिक जैनोद्दीन शेख, शोएब सलीम कुरेशी व अन्य १२ जणांविरुद्ध (सर्व रा. कामगार कॉलनी) गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय सहायक फौजदार विष्णू मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीपक राजेंद्र चव्हाण, अजय गायकवाड व अन्य ३० ते ४० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

jhadhao
आरतीला येणाऱ्या तरुणांवर समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत जखमी झालेले तरुण.

 मेसेजेस गेले अन्‌ जमला मोठा जमाव...
सूत्रांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी नागरिकांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला होता. मारहाण झालेला कृष्णा व अन्य जखमी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. त्याचवेळी चिकलठाण्यात दुसच्या गटाने शेकडोंचा जमाव जमवला. व्हॉट्सॲपवर यासाठी मेसेज पाठवले गेले हाेते. जालना रोडवर रात्री ९ वाजता अचानक घोषणाबाजी सुरू झाली. वाहतूक अडवली गेली. दगडफेक करून एसटी बसची काच फोडली. पोलिसांनी या जमावाला पांगवले.

बुधवारी काय झाले?
बुधवारी सकाळी :
नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी सातला बाजारपेठ उघडली नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन पाच तास उशिराने दुकाने उघडली गेली. नंतर भाजी विक्रेते आले. सकाळी ग्रामस्थांची तासभर बैठक होऊन मंगळवारचा वाद मिटविण्यात आला. माजी नगरसेवक संजय चौधरी, माजी नगरसेवक सोहेल शेख यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले. दोन्ही समाजातील सौख्य टिकवून ठेवत एकोप्याने राहण्याचा संदेश दिला. बाहेरील लोकांमुळे तणाव निर्माण झाल्याचे म्‍हटले.

advt2

बुधवारी रात्री : सकल हिंदू समाजाने समाजकंटकांना प्रत्त्युतर देण्यासाठी महाआरतीचे आयोजन केले. शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्त्वात दीड हजारांवर तरुणांनी एकत्र येऊन महाआरती केली. आरतीनंतर घोषणाबाजी करत जमाव रस्त्यावर उतरला. त्‍यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. महाआरती झाल्यावर उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली. यात काही आक्षेपार्ह घोषणाही होत्या. पोलिसांनी त्‍यांना शांत करण्याचा प्रयत्‍न केला आणि तिथून काढून दिले. रात्री उशिरापर्यंत पोलीस उपायुक्‍त नवनीत काँवत, प्रशांत स्वामी, सहायक पोलीस आयुक्‍त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक गौतम पातारे, संदीप गुरमे, व्यंकटेश केंद्रे, संभाजी पवार, शिवाजीराव तावरे यांच्यासह मोठा बंदोबस्त आणि दंगा काबू पथक तैनात होते. 
 

Tags