छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील अलखैर बैतुल माल नागरी सहकारी पतसंस्थेच्या नावाने बनावट वेबसाईट आणि सोशल मीडिया पेजेस तयार करून अनेकांना लोन देण्याचे आमिष दाखवत गंडविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतसंस्थेचे व्यवस्थापक सय्यद हबीबउल्लाह सय्यद अहमदउल्लाह (वय ५१) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते अल अमिन सोसायटी, एन-१२ सिडको, रोजाबाग, टाटा स्टेडीयम जवळ) राहतात. ते २०१५ पासून पतसंस्थेत व्यवस्थापक आहेत. त्यांची पतसंस्था सभासदांना बिगरव्याजी कर्ज सोने गहाण, तारण ठेवून देते. पतसंस्थेचा ऑनलाइन पद्धतीने व्यवहार चालत नाही. पतसंस्था छत्रपती संभाजीनगर शहराच्या बाहेरील रहिवाशांना किंवा सभासदांना कर्जही देत नाही. कोणत्याही व्यक्तीस किंवा सभासदांना कर्ज देणे किंवा घेण्यासाठी फोनव्दारे स्वतःहून संपर्कही करत नाही. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारे कर्जाबाबत जाहिरातही देत नाही. कुणाला ऑनलाइन पैसे पाठविण्यासाठी विनंतीही करत नाही.
नक्की काय घडले?
एक व्यक्ती अलखैर बैतुल माल नागरी सहकारी पतसंस्थेत आला. मला तुमच्या पतसंस्थेच्या नावाने कडून कर्ज देतो म्हणून एकाने फसवल्याचे त्याने सांगितले. त्याने एम. डी. नईम नावाच्या व्यक्तीचे नाव सांगितले. त्यानंतर मोसीन नासीर कुरेशी हेही पतसंस्थेत आले व तुम्ही मला ऑनलाइन लोनसाठी पैसे पाठविण्यास सांगितले आणि लोन मंजूर केले नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर अब्दुल कय्युम नजमोद्दीन मुल्लाजी हेही पतसंस्थेत आले. त्यांनीही तशीच तक्रार केली. जितेंद्र प्रसाद नावाच्या व्यक्तीनेही पतसंस्थेत येऊन ऑनलाइन पैसे घेऊनदेखील लोन मंजूर केले नसल्याची तक्रार केली. तुम्ही लोन मंजूर करण्याचे चार्जेस भरा, इन्शुरन्स शुल्क भरा, तुम्हाला लोन मंजूर होईल, असे आमिष दाखवून लोकांची फसवणूक होत असल्याचे पतसंस्थेच्या व्यवस्थापकांच्या लक्षात आले.
ही बाब व्यवस्थापकांनी पतसंस्थेचे अध्यक्ष अब्दुल वाजेद कादरी यांना सांगितली. त्यानंतर त्यांनीही सायबर पोलीस ठाण्यात अर्ज दिला. त्यानंतर प्रभाशंकर राय (रा. बिहार) येथील एक व्यक्ती छत्रपती संभाजीनगरला पतसंस्थेच्या कार्यालयात आला व म्हणाला, की तुम्हाला ८ हजार ६० रुपये पाठवूनही तुम्ही लोन मंजूर केले नाही. तुम्ही मला फक्त लोन अप्रुव्हल लेटर दिले आहे, हे बघा. त्यानंतर रशिद अहमद फारुक अहमद चौधरी यांनाही पतसंस्थेच्या नावाने लोनचे आमिष दाखवून १७ लाख रुपयांना चंदन लागल्याचे समोर आले. १ वर्षांपासून कुणीतरी भामटा पतसंस्थेच्या नावाने लोकांना फसवत असल्याने पतसंस्थेच्या वतीने याचा शोध घेण्यात आला असता त्यांना कळले, की अलखैर बैतुल माल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, औरंगाबादचे नावाने वेबसाईट व सोशल मीडियावर वेगवेगळी खाती, पेजेस तयार करून लोकांना फसवले जात आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे करत आहेत.