छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : पुण्यानंतर गुलियन बॅरी सिंड्रोमने (जीबीएस) छत्रपती संभाजीनगरातही शिरकाव केला असून, शहरात ३ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. घाटी रुग्णालयात दाखल झालेल्या तीन रुग्णांत एका १० वर्षीय मुलगी आहे. दरम्यान,‘जीबीएस’ हा पूर्वीपासून असून, घाबरण्याचे कारण नाही, अशी स्पष्टोक्ती घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी केली.
२१ जानेवारीला भुसावळ येथील ३५ वर्षीय महिला, २७ जानेवारीला वसमत (हिंगोली) येथील ३५ वर्षीय महिला घाटीत दाखल झाली. २५ जानेवारीपासून छत्रपती संभाजीनगरातीलच १० वर्षीय मुलगी बालरोग विभागात उपचार घेत आहेत. या तिन्ही रुग्णांना जीबीएसचे निदान झाले आहे. भुसावळ व वसमतच्या रुग्ण महिलांत पॅरालिसिससारखी लक्षणे आहेत. दरम्यान, या आजाराचे रुग्ण पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरात आढळले असे नाही, तर गेल्या वर्षी २०२४ मध्ये घाटी रुग्णालयात जीबीएसचे ९० रुग्ण दाखल झाले होते. यात ६२ मोठ्या व्यक्ती होत्या, तर २८ बालरुण होते. त्यातील चौघांचा मृत्यू झाला होता.
पाणी उकळून प्यावे आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन मेडिसीन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य आणि बालरोग विभागप्रमुख डाॅ. प्रभा खैरे यांनी केले आहे. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. सुक्रे म्हणाले, की ‘जीबीएस’च्या रुग्णाला ‘आयव्हीआयजी’ द्यावे लागते. एका दिवशी पाच व्हायल याप्रमाणे पाच दिवस द्यावे लागते. एका व्हायलसाठी ८ ते ९ हजार रुपये लागतात आणि एका रुग्णावर किमान २ लाखाचा खर्च येतो. हा सगळा उपचार घाटीत मोफत होतो, असे ते म्हणाले. जीबीएसचे ३ रुग्ण समोर आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून, विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.
काय आहे जीबीएस…
अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी, लकवा, अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास, कमजोरी आणि डायरिया (जास्त दिवसांचा) ही तीन लक्षणं जीबीएसची आहेत. नागरिकांनी पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, त्यासाठी पाणी उकळून प्यावं. तसंच, अन्न स्वच्छ आणि ताजं असाव, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा आणि शिजलेलं व न शिजलेलं अन्न एकत्र न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल. आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती शरीराचा बचाव करते. पण जीबीएस हा एक असा दुर्मिळ आजार आहे, ज्यात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. हा रोग अतिशय दुर्मिळ आहे. साधारण ७८ हजार लोकांपैकी एकाला होतो. तो का होतो, याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाहीत. पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर हे होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करते.
एरवी परकीय विषाणू वा बॅक्टेरियांवर हल्ला करणारी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच या आजारात आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. परिणामी नसांना प्रभावीपणे सिग्नल्स पाठवता येत नाहीत. मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही, मेंदूला इतर शरीराकडून मिळणारे संकेत कमी होतात. त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या, वेदना, तापमान, स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्यांच्या कामावर परिणाम होतो. थकवा, हातापायाला मुंग्या येणं – झिणझिण्या येणं हे याचं लक्षण असू शकतं. पायांपासून याची सुरुवात होते आणि नंतर ही लक्षणं हात – चेहऱ्यापर्यंत पसरतात. काहींना पाठदुखी होते. यामुळे स्नायू कमकुवत होतात, हाता- पायांतलं त्राण जातं वा संवेदना जातात, श्वास घ्यायला – गिळायला त्रास होतो. कोणत्याही वयातल्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो. पण त्यातही मोठ्या माणसांमध्ये आणि त्यातही पुरुषांमध्ये याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. काही रुग्णांमध्ये हा आजार अतिशय गंभीर होऊन त्यातून पॅरालिसीस वा श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, पण अगदी गंभीर स्थितीपर्यंत गेलेले रुग्णही यातून पूर्ण बरे झाले आहेत. हा आजार कुठल्याही वयात होतो, कुणालाही कधीही होऊ शकतो.