छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेवर काम करणाऱ्या यश कन्सल्टंट या प्रकल्प सल्लागार समितीने (पीएमसी) शासनाचे ८ कोटी रुपये घेऊन पळ काढल्याचे समोर आले आहे. पीएमसीने आपले संपूर्ण कर्मचारीही काढून घेतले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ८ कोटी तर घेतलेच, पण विशेष बाब म्हणून १ कोटींपर्यंत रक्कमही त्यांनी घेतली आहे. एवढी मोठी रक्कम घेऊन पीएमसी निघून गेली कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेचा आढावा मुंबई उच्च न्यायालयाकडून घेण्यात येत आहे. न्या. रवींद्र घुगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी योजनेचा आढावा घेतला. पुढील सुनावणी ३१ जानेवारी रोजी पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयाने यापूर्वीच पीएमसीची गरज आहे का, अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली होती. अधिका-यांनीही आम्ही सक्षम असल्याचे म्हटले होते. २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पीएमसी म्हणून यश कन्सल्टंटची नेमणूक शासनाने केली होती. १४३८ कोटी रुपयांच्या एका निविदेत ०.४७ टक्के दराने त्यांना काम देण्यात आले होते. या पीएमसीचे कर्मचारी ४ वर्षांपासून योजनेवर काम करत होते. मात्र पीएमसीने अनेक चुका केल्या. चुकीच्या पद्धतीने व्हॉल्व्ह आणि जलवाहिनीवर रस्ता हे मुद्दे प्रामुख्याने चर्चेत आले.
अंगावर प्रकरण शेकत असल्याचे लक्षात घेऊन यश कन्सल्टंटने १५ जानेवारीला स्वतःहून काम सोडत असल्याचे पत्र दिले. लगोलग दुसऱ्याच दिवशी योजनेवरील आपले सर्व कर्मचारीही परत बोलावून घेतले. मात्र ८ कोटी रुपये आणि विशेष बाब म्हणून १ कोटींपर्यंत रक्कम या पीएमसीने घेतली आहे. या रकमेच्या वसुलीचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तातडीने दुसऱ्या एका पीएमसीची नियुक्ती केल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी यश कन्सल्टंटला जाऊ कसे दिले आणि आजवर त्यांना दिलेल्या रकमेचे काय, असा प्रश्न निर्माण झाला असून, दंड वसूल करण्याऐवजी ९ कोटी रुपये अदा करून या पीएमसीला जाऊ दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, विशेष बाब म्हणून पीएमसीला दिलेले १ कोटीही वादात सापडले आहेत.