छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गंगापूर येथील १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बजाजनगरच्या महाराणा प्रताप चौकातील रायगड लॉजवर तीनदा नेऊन बलात्कार करणाऱ्या युवकाविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी (२४ जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे. रवी राजू मोरे (रा. आंबेलोहळ, ता. गंगापूर) असे संशयिताचे नाव आहे.
कुटुंबीयांसोबत राहणारी तरुणी आई नसली की दुकानात बसायची. ५ सप्टेंबर २०२४ रोजी ती दुकानात बसलेली असताना रवी दुकानात आला. तिथे त्याने ओळख वाढवून तिचा मोबाइल नंबर मिळवला. त्यानंतर वारंवार संपर्क करत मैत्री केली. तासन्तास दोघे कॉलवर बोलू लागले. त्याने तिला भेटण्यासाठी आग्रह धरला. तरुणी छत्रपती संभाजीनगरच्या एका कॉलेजमध्ये शिकते. तो तिला भेटायला तिच्या कॉलेजमध्ये गेला. यावेळी रवीने तिच्यासोबत मोबाइलमध्ये फोटो काढले. नंतर रवी दोघे लॉजवर जाऊ, अशी गळ तरुणीला घातली. मात्र तरुणीने नकार दिला.
त्यावर रवीने तिला धमकावत तू आली नाहीस तर सोबत काढलेले फोटो तुझ्या आई- वडिलांना दाखवितो, असे धमकावले. त्यामुळे तरुणी घाबरून त्याच्यासोबत येण्यास तयार झाली. रवीने दुचाकीवरून तिला बजाजनगरच्या महाराणा प्रताप चौकातील एका लॉजवर नेले. तिथे तिच्यासोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या संबंधाचे त्याने मोबाइलमध्ये चित्रीकरणही करून घेतले. त्यानंतर त्याने तिला शहरातील तिच्या कॉलेज परिसरात सोडले. नंतर तिला वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू लागला. त्याचा त्रास असह्य झाल्याने अखेर तरुणीने पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर पालकांसोबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय गिते करत आहेत.