छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दुभाजक तोडणे, गतिरोधकाची उंची प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी करणे अशी बेकायदेशीर कृत्ये करणारे व्यावसायिक, पेट्रोलपंप चालक, हॉटेलचालक यांच्यावर परिवहन, पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संयुक्तपणे कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, २४ जानेवारीला दिले.
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, मुख्य कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हिमांशू पाटील, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अनिल थोरात, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे, जागतिक बँक प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता एम. एन. सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, मोटार वाहन निरीक्षक योगेश सापिके यांच्यासह जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य बैठकीस उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध रस्त्यांवरील एकूण ९७ संभाव्य धोक्याची ठिकाणे अधिसूचित केली आहे. या ठिकाणी उपाययोजना म्हणून गतिरोधक, रस्त्यावर विविध खुणा, दिशादर्शक फलक, पांढऱ्या पट्टे, दुभाजक यासारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे. शाळेसाठी असणाऱ्या विविध स्कूल बसेसची तपासणी करण्याची मोहीम हाती घ्यावी. वाहनांच्या तपासणीबरोबरच वाहनचालकांची देखील आरोग्याची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या. एसटी महामंडळाच्या बस स्टॅन्ड ठिकाणी वाहकांची देखील आरोग्य तपासणीसाठी शिबिर आयोजित करण्याचे निर्देश आरोग्य विभाग, महानगरपालिका व जिल्हा परिषद यांना देण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग रस्त्याला जोड रस्ता असणाऱ्या ठिकाणी दुभाजक किंवा गतिरोधक असणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी संयुक्तपणे काम करावे. ज्या ठिकाणी पेट्रोल पंप किंवा हॉटेल चालकांनी रस्त्यावरील दुभाजक तोडले आहेत येथे पोलीस विभागामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करून संबंधित व्यावसायिक यांच्याकडून दुभाजक त्यांच्याकडून दुरुस्त करून घेण्याची कारवाई करावी. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपाच्या शेजारी जर असे करण्यात आले असेल तर पेट्रोल पंप चालकांना कायदेशीर नोटीस देऊन गुन्हा दाखल करावा. विविध महाविद्यालयांमध्ये युवकांमध्ये रस्ते अपघात होऊ नये यासाठी जाणीव जागृती पर कार्यक्रमाचे आयोजन करावे. यामध्ये मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरात सर्वाधिक अपघात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे!
शहरात होणारे जास्तीत जास्त अपघात हे ऑटोरिक्षांमुळे व ऑटो रिक्षा अयोग्य चालवण्याच्या पद्धतीमुळे होतात. यासाठी ऑटो रिक्षा चालकांचे समुपदेशन आणि आरोग्य तपास शिबिर आयोजित करण्याचे निर्देश महापालिका आणि आरोग्य तसेच पोलीस विभागांना देण्यात आले. चालकाची अल्कोहोल तपासणी, वाहनांची तपासणी, विविध प्रसारमाध्यमातून रस्ता सुरक्षा बाबत जाणीव जागृतीपर कार्यक्रमासाठीचे आवाहन, राष्ट्रीय महामार्ग विभाग, पोलीस, परिवहन, आरोग्य, राज्य रस्ते विकास महामंडळ या विभागामार्फत करण्यात यावे आदी सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी बैठकीत दिल्या.