छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॅलो डॉक्टर… डोकं दुखतंय, ताप आलाय, घसा खवखवतोय … ‘ हा संवाद आहे रुग्ण आणि डॉक्टरांमधला. हा संवाद घडतो तो ई- संजिवनी ॲपवर. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आरोग्यवर्धिनी योजनेअंतर्गत टेलिमेडिसिनद्वारे ऑनलाइन इ-संजीवनी ओपीडी सेवा सुरू केली. आपल्या जिल्ह्यात ऑगस्ट २०२० पासून १ लाख ७४ हजार रुग्णांनी या योजनेचा लाभ घेत घर बसल्या मोफत आरोग्य सल्ला घेतला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ही सेवा २१ ऑगस्ट २०२० रोजी सुरू झाली. त्यासाठी ६ संगणकांचा कक्ष सुरू करण्यात आला. त्याद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांना टेलि- कन्सल्टेशनद्वारे जनरल मेडिसिन, स्त्रीरोग, अस्थिव्यंगोपचार, कान, नाक, घसा, बालरोग, नेत्ररोग, मानसोपचार तज्ञांकडून सेवा दिली जाते. महत्त्वाचे म्हणजे ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत अशा रुग्णांनी सुद्धा जवळील केंद्रात जाऊन अधिकाऱ्यांच्या पोर्टल वर नोंद करून तज्ञांकडून आरोग्य विषयक ऑनलाईन सल्ला घेतला, असे ई- संजीवनी चे नोडल अधिकारी डॉ.भारती नागरे व समन्वयक सोहन ठोंबरे यांनी सांगितले.
या ॲपच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वेबसाइट किंवा अॅपवर नोंदणी करता येते. त्यासाठी https://esanjeevani.mohfw.gov.in या संकेतस्थळावर किंवा esanjeevani-MoHFW हे ॲप डाऊनलोड करून स्वतः नोंदणी करावी. आपले आरोग्यासंबंधीचे कागदपत्र अपलोड करावे. त्यानंतर टोकन जनरेट होईल. इ-संजीवनी ओपीडीला गेल्या ४ वर्षांपासून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रुग्णांना थेट तज्ज्ञांची सेवा या टेलिकन्सल्टेशनद्वारे मोफत मिळते. त्याचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच ॲप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घरातील इतर सदस्यांना सुद्धा यात सहभागी करून घ्यावे. ओपीडीची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ अशी असते. या वेळेत तुम्ही मोबाइल ओटीपीसह नोंदणी केल्यानंतर त्यावेळेत ऑनलाइन वेटिंग रूममध्ये प्रतीक्षा केल्यावर कॉल नाऊचे बटन सुरू होईल. त्यानंतर रुग्णाला व्हिडिओ कॉलसंदर्भात आमंत्रित केले जाते. व्हिडिओ कॉलवर डॉक्टर रुग्णांशी संवाद साधून डॉक्टर सल्ला देतात. त्यानंतर लगेच इ- प्रिस्क्रिप्शन मिळते. सध्याच्या डिजीटल तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अधिकाधिक रुग्णांनी घरबसल्या या निःशुल्क ऑनलाइन सल्लासुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बडे यांनी केले आहे.