वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील रांजणगाव शेणपुंजीत महादेव मंदिरातील पिंडीवरील पितळी नाग पिशवीत घालून चोरट्याने नेला होता. चंद्रकांत तुकाराम सातपुते (वय २१, रा. सोनवळा, ता. अंबाजोगाई, ह. मु. कमळापूर फाटा) याला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अटक करून भोळ्या देवाचा नाग परत आणून दिला आहे.

चंद्रकांतने रांजणगाव शेणपुंजीतीलच श्री राम मंदिरातील तांब्याच्या वस्तू, बजाजनगर येथील शनिमंदिरातून पितळी घंटा चोरून नेल्या होत्या, असे समोर आले आहे. महादेव मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो टिपला गेला होता. तो कमळापूर फाटा परिसरात राहत असल्याचे कळताच मंगळवारी (२१ जानेवारी) पहाटे तीनला सापळा रचून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबुली दिली. चोरी केलेला मुद्देमाल त्याने इटावा येथील भंगार दुकानदार मुजीब रहिमान शेख व मोहम्मद आरेफ खान पाशाखान (दोघेही रा. इटावा, ता. गंगापूर) यांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्या दुकानांची झडती घेऊन मुद्देमाल जप्त केला.

गेल्या आठवड्यातच मुजीब चोरीच्या गुन्ह्यातून सुटून आला होता. पुन्हा त्याने चोरीचा माल खरेदी केला. पोलिसांनी ७ हजारांचा पितळी नाग, २ हजार रुपयांची पितळी घंटा, १ हजार रुपयांचा पितळी दिवा, ६ हजार ८०० रुपयांच्या चार नागफणी, २ लाख रुपयांची बुलेट असा एकून २ लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बन, पोलीस अंमलदार धीरज काबलिये, शिवनारायण नागरे, गणेश सागरे, रोहित चिंधाळे, हनुमान ठोके, यशवंत गोबाडे, समाधान पाटील, मनमोहनमुरली कोलमी, संजय बन्सोडे, बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे यांनी केली.