सिल्लोड (सीएससीएन वृत्तसेवा) : खोडकाईवाडी (ता. सिल्लोड) गावाजवळून पूर्णा नदी वाहते. नदीपात्राच्या बाजूला असलेला रस्ता बुधवारी (२२ जानेवारी) सकाळी शेतकरी संजय हरीलाल गुंजाळ दुरुस्त करत होते. याचवेळी त्यांना चिखलात फसलेल्या ५ पुरातन मूर्ती दिसून आल्या. भगवान गौतम बुद्ध व भगवान पार्श्वनाथ, आदेश्वर भगवान, यक्षणी देवी, नेमीनाथ भगवान यांच्यासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या भंगलेल्या अवस्थेतील या मूर्ती महसूल प्रशासनाने ताब्यात घेतल्या. पंचनामा करून अहवाल भारतीय पुरातत्व विभागाला पाठविल्याची माहिती तहसीलदार संजय भोसले यांनी दिली.

शेतकरी संजय गुंजाळ यांना सुरुवातीला भगवान गौतम बुद्धांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या भंगलेल्या अवस्थेतील दोन मूर्ती दिसल्या. गुंजाळ यांनी तत्काळ महसूल प्रशासनाला कळवले. त्यानंतर तलाठी अनिल सावळे, विशाल दुनगहू, सिल्लोड शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुंढे, रामानंद बुधवंत, भूषण पाटील यांनी या नदीपात्रात येऊन त्या दोन्ही मूर्ती ताब्यात घेतल्या. मूर्तीचा पंचनामा करून तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये ठेवल्या. गुरुवारी (२३ जानेवारी) पुन्हा याच नदी पात्रातील विहिरीजवळ आणखी तीन मूर्ती सापडल्या. त्या मूर्ती भगवान पार्श्वनाथ, आदेश्वर भगवान, यक्षणी देवी, नेमीनाथ भगवान यांच्यासारख्या हुबेहूब दिसत आहेत. या भागात उत्खनन केल्यास आणखीही बऱ्याच पुरातन मूर्ती सापडू शकतात, अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.