छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : रेल्वे विभागात तिकीट तपासनीसाची (टी.सी.) नोकरी लावून देण्याच्या आमिषाने श्याम विनायक देवकर (३५, रा. गारखेडा) यांना तिघांनी साडेआठ लाख रुपयांनी गंडवले. श्याम यांनी स्वतःची जमीन तारण ठेवली, पत्नीचे दागिने विकले आणि भामट्यांना पैसे दिले. पण त्यांनी हातावर बनावट नियुक्तीपत्र ठेवत फसवणूक केली.
विलास कडुबा खरात (रा. रामनगर), अप्पासाहेब पांडुरंग नीळ (रा. लोकशाही कॉलनी) व काकासाहेब आळींग (रा. कन्नड) अशी या भामट्यांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विलासला पोलिसांनी अटक केली आहे. मार्च २०२३ मध्ये विलासने श्याम यांना रेल्वेत टी.सी.ची नोकरी १२ लाखांत लावून देतो, असे सांगितले. त्याने टी.व्ही. सेंटर भागात अप्पासाहेब नीळसोबत ओळख करून दिली. श्याम यांनी विश्वास ठेवत विलासला २ लाख ९० हजार रुपये दिले.
७ जून २०२३ रोजी विलासने श्याम यांना सिडको एन-२ मधील क्रिकेट मैदानाजवळ बोलावले. विलाससोबत असलेल्या काकासाहेबने श्याम यांच्या हातात बंद पाकिटात टी.सी.चे ऑफर लेटर टेकवले. श्याम यांनी भामट्यांना पैसे देण्यासाठी गावची ३ एकर १० गुंठे जमीन तारण ठेवून ६ लाख रुपये घेतले. १.७० लाखाची एफडी, पत्नीचे दागिने मोडून पैसे दिले. २५ जुलैला पुणे रेल्वेस्थानकावर गेले असता तेथे अशी कुठलीच जागा निघाली नसल्याचे कळाल्यावर त्यांना धक्काच बसला.