छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग उपवने व उद्याने यांच्या वतीने ८ व ९ फेब्रुवारी २०२५ रोजी ४५ व्या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन व उद्यान स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेत व प्रदर्शनात अधिकाधिक स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक जे. व्ही. चौगुले यांनी केले आहे.
इच्छुक स्पर्धकांसाठी प्रवेशिका देणे व स्वीकारण्यासाठी देण्यात आलेला कालावधी असा : पुष्प प्रदर्शन स्पर्धा २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी, उद्यान स्पर्धा २७ जानेवारी ते ४ फेब्रुवारी. या विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शनात गुलाबपुष्पे फुलदानातून, मोसमी फुले, बहुवार्षिय फुले, कॅक्टस व सकुलंट, कुंड्यातील शोभीवंत झाडे, लॅण्डस्केप ऑन द स्पॉट, कलात्मक पुष्परचना, उद्यान स्पर्धा आदी विभाग आहेत. प्रत्येक विभागातील विजेत्यास एक चषक, पुष्पप्रदर्शनात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या स्पर्धकास उपवने व उद्याने विभाग छत्रपती संभाजीनगर यांनी पुरस्कृत केलेला फिरता चषक प्रदान करण्यात येईल. स्पर्धेतील व सर्व गटांकरिता वेगवेगळी परितोषिके ठेवण्यात आली आहेत.
पुष्परचना, पुष्प रांगोळी या विभागासाठीही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. उद्यान स्पर्धा या उद्यानाचा प्रकार, आकार अशा वेगवेगळ्या गटांमध्ये असून स्पर्धेत भाग घेतलेल्या उद्यानांचे परिक्षण ५ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येईल. प्रवेशिका सहाय्यक संचालक, उपवन व उद्याने यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक विभाग, मध्यवर्ती इमारत (विस्तार) अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर येथे स्वीकारण्यात येतील. पुष्पप्रदर्शनाबाबत अधिक माहितीसाठी सहायक संचालक जे. व्ही. चौगुले ८६९८०७०८८२, उद्यान अधीक्षक एस. टी. जाधव ९१७२५५९७९८, एस. टी. काळे ९४२१३०७५७५ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.