छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजिंठा नागरी सहकारी बँकेतील ९७.४१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्षभरापासून बँकेचे चेअरमन माजी आमदार सुभाष झांबड फरारी असून, अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एन. एम. जमादार यांच्याकडे अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर झांबड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील केले. मात्र खंडपीठाचे न्या. संतोष चपळगावकर यांनीही सोमवारी (२० जानेवारी) त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे झांबड यांची अटक आता अटळ मानली जात आहे.
क्रांती चौक पोलिसांनी या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर झांबड १८ ऑक्टोबर २०२३ पासून फरारी आहेत. खंडपीठाने १० जानेवारी रोजी निकाल राखून ठेवला होता. सोमवारी अटकपूर्व जामीन फेटाळल्याचा निकाल देण्यात आला. झांबड यांच्या वतीने ॲड. एस. जी. लड्डा व ॲड. अक्षय लोहाडे यांनी काम पाहिले. राज्य शासनाच्या वतीने ॲड. विशाल बडाख यांनी बाजू मांडली. प्रशासकांना बँकेच्या लेखा परीक्षणात नेटवर्थ रक्कम व सीआरएआर (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक, तसेच ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळले. बेकायदा कर्ज वाटप, इतर बँकांतील ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद प्रमाणपत्र आणि आरबीआयला पाठविण्यात आलेला खोटा लेखापरीक्षण अहवाल या मुद्यांवरून प्रशासकांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.