पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव हायवाने दुचाकीला मागून उडवले. यात दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी (२० जानेवारी) दुपारी तीनला पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील संत एकनाथ कारखान्यासमोर घडली.
राम राधाकिसन मुळे (वय ४७, रा. ढोरकीन ता. पैठण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. राम मुळे हे मित्रासोबत दुचाकीने (क्र. एमएच २० एएन ७९५३) पैठणकडे निघाले होते. संत एकनाथ कारखान्यासमोर मागून भरधाव आलेल्या खडी भरलेल्या हायवाने (एमएच २० सीटी ५२१९) त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात राम मुळे हायवाच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाले, तर त्यांचा मित्र अपघातातून बालंबाल बचावला.
अपघाताची माहिती मिळताच पैठण एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राम मुळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अपघातानंतर हायवाचालकाने गाडी न थांबविताच पैठणच्या दिशेने पळ काढला. पैठण एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून हायवासह चालकाला पैठण येथून ताब्यात घेतले.