सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : जंगली कोठा (ता. सोयगाव) शिवारातील शेतात रब्बीच्या पिकांना पाणी देण्यासाठी वीज पंप सुरू करताना पाय घसरून विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. घटना दुर्दैवी घटना रविवारी (१९ जानेवारी) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.
मुकेश धनसिंग राठोड (वय २५, रा. बोरमाळ तांडा, जंगलीकोठा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांच्या नावावर असलेल्या जंगलीकोठा शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी मुकेश गेला होता. याप्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्र बनोटी येथे शवविच्छेदन करण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. घटना घडली तेव्हा त्याचे आई-वडील ऊसतोडीला गेले होते, त्यामुळे शेतीची जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याच्या पश्चात आई, वडील, एक अविवाहित भाऊ आहे.