छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पैठण- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर धनगाव शिवारात (ता. पैठण) येथे शनिवारी (१८ जानेवारी) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. आकाश मल्हार भावले (वय १९, ढोरकीन, रा. ता. मृत आकाश पैठण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आकाश दुचाकीने (क्र. एमएच २० डीए १७५४) पैठणवरून ढोरकीन जात होता. रस्त्यावरील खड्डा अंधारात न दिसल्याने त्याची दुचाकी आदळून दुभाजकाला धडकली. आकाशचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावरून नागरिक प्रवास करत असताना त्यांना रस्त्याच्या एका बाजूला एक दुचाकी व आकाश मृतावस्थेत दिसला.
नागरिकांनी पैठण एमआयडीसी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आकाशला बिडकीनच्या शासकीय रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आकाशच्या पश्चात आई, वडील, चुलता, चुलती, आजी, आजोबा, एक बहीण, पत्नी असा परिवार आहे. आकाश आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. दहा महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते.
पहाटेचे स्वप्न खरे ठरले…
आकाशचा रस्त्यावर अपघात झाल्याचे स्वप्न आकाशच्या आई व बहिणीला शनिवारी पहाटे पडले होते. यामुळे त्यांनी आकाशला घराबाहेर जाण्यास विरोध केला होता. पण स्वप्न खरे नसतात, असे सांगून तो कामानिमित्ताने दुचाकीने बाहेर गेला होता आणि दुर्दैवाने निसर्गाने दिलेला इशारा खरा ठरला. आकाशच्या वडिलाचे पानसुपारीचे दुकान आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.