पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : पुण्यात एअर होस्टेसचे शिक्षण घेण्याऱ्या २१ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना समोर आली आहे. पैठण पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी (१७ जानेवारी) विजय शिंदे (रा. प्रभात कॉलनी, वाकड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुणी पैठणची असून, ती पुण्यात एअर होस्टेसचे शिक्षण घेत होती. पुण्याच्याच एका मॉलमध्ये पार्टटाईम काम करत असताना तिची ओळख विजय शिंदे या तरुणासोबत झाली. ओळखीतून मैत्री आणि मैत्रीतून दोघांत प्रेम फुलले. यातून विजयने तिला पुणे येथील डांगे चौक भागातील एका लॉजवर तर कधी भाड्याच्या खोलीवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
या शरीरसंबंधाचे अश्लील व्हिडीओ बनविले. हे अश्लील व्हिडीओ तिला पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली व वेळोवेळी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रकार थांबत नसल्याने ती शुक्रवारी (१७ जानेवारी) पैठणला निघून आली. कुटुंबीयांना घडला प्रकार सांगितला. त्यानंतर पैठण पोलीस ठाणे गाठून तिने तक्रार दिली. त्यावरून विजय शिंदेविरुद्ध पैठण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
वैजापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
वैजापूर शहरातील कादरीनगर भागातील १५ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून दानीश लियाकत शेख या युवकाने घरात घुसून तिच्यासोबत अश्लील चाळे केले. मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी दानीशच्या घरी जाऊन जाब विचारला असता दानीशच्या कुटुंबीयांनी त्यांनाच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून दानीश शेखसह अलमास लियाकत शेख व अफरीन लियाकत शेख या तिघांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.