छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : परस्त्रीच्या नादाला लागून एकाने बायकोला सोडून दिले. परस्त्रीसोबत बायकोच्या संमतीविनाच लग्नही केल्याचेही नंतरच्या काळात समोर आले. त्यामुळे विवाहितेने हर्सूल पोलीस ठाण्यात धाव घेऊन शनिवारी (१८ जानेवारी) तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हर्सूलच्या बेरीबागमध्ये राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तिचे लग्न १२ मे २०१८ रोजी झाले होते. तिचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो. लग्नानंतर पाच- सहा महिने तिला पतीने चांगले वागविले. त्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ करण्यास सुरुवात केली. तुझ्या आई- वडिलांकडून फोरव्हिलर घेण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सुरू केली. तिला पतीपासून २२ फेब्रुवारी २०१९ रोजी मुलगा झाला. आता तिचा मुलगा ६ वर्षांचा आहे. याचदरम्यान तिच्या पतीचे परस्त्रीसोबत अनैतिक संबंध निर्माण झाले. ८ सप्टेंबरला त्याने तिला घरात बेदम मारहाण करून घरातून निघून गेला. त्यानंतर त्याने प्रेयसीसोबत लग्न केले, असे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार निर्मला कोलते करत आहेत.