छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सिल्लोड तालुक्यात तब्बल ४ हजार ७३० बांगलादेशी नागरिक वास्तवास आहेत. त्यांच्या नागरिकत्वाशी निगडित प्रमाणपत्रे तपासावीत, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली. सोमय्या छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी (१७ जानेवारी) आले होते. जिल्ह्यात एकूण १०,०६८ बांगलादेशी नागरिक असण्याची शक्यता असून, यात छत्रपती संभाजीनगरात २ हजार ४४८ बांगलादेशी नागरिक असू शकतात. त्यांच्या प्रत्येक अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करावी, असेही सोमय्यांनी म्हटले आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात दोन लाखांवर बांगलादेशी महाराष्ट्रात आले. १७ जिल्ह्यांचा दौरा केल्यावर तेथे आलेल्या ९० टक्के अर्जातील कागदपत्रे बोगस असल्याचा दावा सोमय्यांनी केला. त्यांचे बोगस अर्ज मंजूर करण्यासाठी काँग्रेस, ठाकरे गट, एमआयएमचे नेते राजकीय बळ वापरत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, की २०२४ मध्ये जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले. मालेगाव आणि अमरावतीत रोहिंग्यांच्या घुसखोरी प्रकरणात चौकशी करण्यासाठी विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन केली आहे. ही एसआयटी संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचेही सोमय्यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकारांना सांगितले, की जन्मप्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांनी अर्ज केले आहेत. त्यांच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, असेही ते म्हणाले.