कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : सुरमाळ (ता. कन्नड) येथील श्रीक्षेत्र नवनाथ देवस्थानाचे मठाधिपती बालब्रह्मचारी महंत १०८ विष्णूगिरी महाराज यांचे गुरुवारी (१६ जानेवारी) दुपारी ३.३० वाजता अल्पशा आजाराने देहावसान झाले होते. हजारो भक्त व संत-महंतांच्या उपस्थितीत शुक्रवारी (१७ जानेवारी) दुपारी एकला समाधिस्त करण्यात आले.

महंत १०८ विष्णूगिरी महाराज भोकरदन तालुक्यातील पावन गणपती संस्थानचेदेखील ते मठाधिपती होते. वे.सं. पुरोहित गणेश जोशी यांच्या विधिवत मंत्रोपचारात महाराजांना सुरमाळ येथील मंदिरात समाधिस्थ करण्यात आले. या वेळी महामंडलेश्वर धर्माचार्य योगिराज दयानंद महाराज, महामंडलेश्वर शनिभक्त सुखदेव महाराज, नामदेव महाराज, बालयोगी सर्वानंद सरस्वती महाराज, महंत केशवानंद महाराज, खडेश्वर महाराज, गणेश भुसारे महाराज आदींसह अनेक संत-महंतांची उपस्थिती होती. राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित होते. ३१ जानेवारीला शेकडो संत-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत विष्णुगिरी महाराजांचा सोरशी सोहळा होणार असल्याची माहिती देण्यात आली.