- Marathi News
- सिटी क्राईम
- आदर्श पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांचा छत्रपती संभाजीनगरात टाहो; ३४७ कोटींचा घोटाळा, ४८ मृत्यू, प्रशा...
आदर्श पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांचा छत्रपती संभाजीनगरात टाहो; ३४७ कोटींचा घोटाळा, ४८ मृत्यू, प्रशासनाने मागितला आणखी १ महिना!!
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३४७ कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याला दोन वर्षे उलटून गेली, तरी आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळालेल्या नाहीत. शुक्रवारी (१८ जानेवारी) ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची सायंकाळी भेट घेतली. एका महिन्यात आदर्श पतसंस्थेच्या मालमत्तांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी लागेल, असे […]
छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ३४७ कोटींचा घोटाळा उघडकीस येण्याला दोन वर्षे उलटून गेली, तरी आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांना ठेवी परत मिळालेल्या नाहीत. शुक्रवारी (१८ जानेवारी) ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची सायंकाळी भेट घेतली. एका महिन्यात आदर्श पतसंस्थेच्या मालमत्तांच्या लिलावाचा प्रश्न मार्गी लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवीदारांना सांगितले. लेखी आश्वासनामुळे महिनाभरासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले.


पाच महिला ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी सहाला अचानक प्रवेश केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर घोषणाबाजी सुरू केली. रक्कम महिनाभरात मिळणार हे लेखी द्या अशी मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू केले. यात एका महिलेला भोवळ आली. त्यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने पोलिसांनी जमाव पांगवला.

प्रक्रिया संथगतीने…
गेल्या दोन वर्षांत पदरात काहीही न पडल्याने ठेवीदार संतप्त झालेले आहेत. मालमत्तांचा लिलाव, कर्जवसुली, कर्जदारांची मालमत्ता जप्ती ही सगळी प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. सध्या ३३ हजार ६५ ठेवीदारांचे ३४७ कोटी ७२ लाख रुपये पतसंस्थेत अडकले आहेत. २८८१ ठेवीदारांना आतापर्यंत केवळ २ कोटी ८७ लाख देण्यात आले आहेत. १८ कोटी ५० लाखांच्या १५ मालमत्तांचा लिलाव सुरू आहे. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनीही या प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. १५४१ जणांकडे पतसंस्थेचे ३२० कोटींचे कर्ज थकीत असल्याचेही आजवरच्या चौकशीत समोर आले आहे.