गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : वरखेड (ता. गंगापूर) येथे दोन महिन्यांची गरोदर असलेल्या विवाहित तरुणीचा आज (१७ जानेवारी) दुपारी संशयास्पद मृत्यू झाला. रेणुका ज्ञानेश्वर मतकर (वय १९, रा. वरखेड) असे या विवाहितेचे नाव आहे. पतीने तिला गंगापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले होते, डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तो मृतदेह बेवारस सोडून पळून गेल्याने संशयाची सुई त्याच्याकडे वळली. रेणुकाच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळीवर आरोप केले. दरम्यान, रात्री उशिरा हाती आलेल्या वृत्तानुसार, रेणुकाचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, तिथे पुन्हा उत्तरीय तपासणी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
आज सकाळी ११ च्या सुमारास रेणुकाला पती ज्ञानेश्वर हिराचंद मतकर याने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र डॉक्टरांनी तपासून ती मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर ज्ञानेश्वरने मृतदेह तसाच सोडून रुग्णालयातून पळ काढला. याची माहिती रेणुकाच्या माहेरकडच्यांना कळल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत जोपर्यंत सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यानंतर शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नजीर शेख यांनी सहकाऱ्यांसह गंगापूरला रुग्णालयात येत गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. नातेवाइकांची समजूत घालत उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवला. दरम्यान, उत्तरीय तपासणीच्या अहवालावर माहेरकडील नातेवाइक समाधानी झाले नाहीत. त्यामुळे पुन्हा मृतदेहाची उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात होणार असल्याचे रात्री उशिरा सूत्रांनी सांगितले.
रेणुकाचे शेंदुरवादा माहेर असून तिचा वरखेड येथील ज्ञानेश्वर हिराचंद मतकरसोबत ३१ जानेवारी २०२३ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरच्यांकडून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी होऊन छळ होत असल्याची तक्रार रेणुकाने माहेरच्यांकडे केली होती. रेणुकाचे वडील रमेश नरवडे यांचा विवाहापूर्वीच मृत्यू झालेला असून तिची आई व लहान भाऊ असे दोघेच आहेत. आई मोलमजुरी करत असल्याने पाच लाख रुपये देऊ शकत नसल्याचे रेणुकाने सासरच्या मंडळींना सांगितले. त्यानंतर सासरच्यांनी तिचा अधिकच छळ सुरू केला होता. वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होते. याबाबत वाळूज पोलीस ठाण्यात रेणुकाच्या आईने तक्रारही केली होती. रेणुकाच्या व्हिसेरा वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून तो अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल, असे उत्तरीय तपासणी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.