गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : मालुंजा (ता. गंगापूर) येथे एका बिबट्याने आज, १७ जानेवारीला सकाळी चांगलीच धमाल उडवून दिली. शेतकरी गजानन परसराम साळुंके यांच्या घराजवळील लिंबाच्या झाडावर बिबट्या चढलेला काही शेतकऱ्यांनी पाहिले अन् त्यांना डोळ्यांवर विश्वासच बसेना… गावात हे कळताच बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली…वनविभाग आणि पोलिसांना कळविण्यात आले. अखेर दुपारी २ ला बिबट्याला सुरक्षित पकडण्यात वनविभागाला यश आले.

गावकऱ्यांनी शिल्लेगाव पोलिसांना कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार तात्यासाहेब बेदरे घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे वनरक्षक नारायण चाथे हेही घटनास्थळी धावले. त्यानंतर रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील रेस्क्यू टीममधील वनपरीक्षेत्र अधिकारी अनिल गायके यांनी सहकाऱ्यांसह येऊन अथक परिश्रमानंतर दुपारी दोनला बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. मात्र त्याआधी बराच वेळ बिबट्याने टीमला झुलवले.

काही केल्या खाली उतरायला तयार नसल्याने टीमही त्याचे कारनामे पाहून थक्क झाली होती, तर गावकरी हा पकडापकडीचा खेळ पाहण्यात दंग झाले होते. या वेळी वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. भिषे, वनपाल अनिल पाटील, श्री. बर्डे, वनरक्षक नारायण चाथे, वनमजूर तसेच इतर कर्मचारी व शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस अंमलदार तात्याराव बेदरे, अशोक निकम, विष्णू जाधव, अर्जुन तायडे, सुरडकर यांनी बिबट्याला पकडण्याकामी मोलाची भूमिका बजावली.