सोयगाव (सीएससीएन वृत्तसेवा) : सोयगाव तालुक्यातील निंबायती शिवारात शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन रामलाल चतरू राठोड (वय ५२, रा. निंबायती) या अल्पभूधारक कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (१६ जानेवारी) सकाळी आठला घडली.
राठोड यांच्याकडे एकत्रित कुटुंबात दोन एकर शेती असून, त्यांच्यावर बँकेसह खासगी ३ लाख रुपये कर्ज होते. खरिपाचे पीक अतिवृष्टीमुळे हातचे गेले. रब्बी पिकातही फारशे उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे ते नैराश्यात होते. कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, याची चिंता त्यांना होती. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर सायंकाळी चारला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.