गंगापूर (गणेश म्हैसमाळे : सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव जीप उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडकल्याने हैदराबाद येथील चौघा भाविकांचा मृत्यू, तर १२ भाविक जखमी झाल्याची घटना गंगापूर-वैजापूर मार्गावरील शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांबूळगोटा फाट्याजवळ बुधवारी (१५ जानेवारी) रात्री दहाच्या सुमारास घडली होती. अपघातातील मृतकांचे नातेवाइक हैदराबादवरून आल्यानंतर त्यांना मृतकांच्या अंगावरील २ लाख ८३ हजार रुपयांचे दागिने दिसून न आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीवरून शिल्लेगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध आज, १६ जानेवारीला गुन्हा दाखल केला आहे.
वैद्विक ऊर्फ नंदन श्यामशेट्टी (वय ६ महिने), प्रेमलता कृष्णमूर्ती श्यामशेट्टी (वय ५८), त्यांची मुलगी लक्ष्मीप्रसन्ना कृष्णमूर्ती श्यामशेट्टी (वय ४५) आणि नात अक्षिता कृष्णमूर्ती श्यामशेट्टी (वय २१) यांचे मृतदेह अपघातानंतर शिल्लेगाव पोलिसांनी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले होते. नवीन ओपीडी इमारतीत मृतदेह ठेवलेले होते. अपघाताची माहिती हैदराबादला नातेवाइकांना कळल्यानंतर प्रेमलता यांचा पुतण्या मनीकंठा रमेश श्यामशेट्टी (रा. कोंडागडप्पा, हैदराबाद) याने अन्य नातेवाइकांसह गंगापूर गाठले. यावेळी मृतदेहांच्या अंगावर दागिने दिसून आले नाहीत.
प्रेमलता यांच्या अंगावर १ लाख रुपयांच्या दोन तोळ्यांच्या सोन्याच्या चार बांगड्या, दीड लाख रुपयांचे तीन तोळ्यांचे दोन पदरी साखळी असलेले सोन्याचे पदक, अक्षिताच्या हातातील २० हजार रुपयांची चार ग्रॅमची सोन्याची अंगठी गायब होती. याशिवाय जखमी व्यंकटेश श्यामशेट्टी यांच्या खिशात असलेले १३ हजार रुपयेसुद्धा कुणीतरी काढून घेतल्याचे समोर आले. मनीकंठा श्यामशेट्टी यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही चोरी नक्की कुणी केली हा प्रश्न असून, मदत करणाऱ्यांनी केली की रुग्णालयातील कुणी केली याचा शोध लावण्याचे आव्हान आता गंगापूर पोलिसांसमोर आहे.
कसा झाला होता अपघात…
हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डीला आले होते. साईबाबाच्या दर्शनानंतर बुधवारी सकाळी ते जीपने (क्र. एमएच १७ बीडी १८९७) वेरूळला आले. वेरुळ लेणी पाहून व घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन गंगापूरमार्गे परत शिर्डीला निघाले असताना तांबूळगोटा फाटा येथे महालगावकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला (क्र. एमएच २० एफयू २६३३) जीपने मागून जोरात धडक दिली. सर्व जखमींना पोलिसांच्या जीपमध्ये टाकून गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. हा अपघात उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर व टेल लॅम्प नसल्याने घडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर लावणे पोलिसांनी सक्तीचे करावे, अशी मागणी होत असते. मात्र पोलिसांनी या मागणीला आजवर गांभीर्याने न घेतल्याने चार जणांना प्राण गमवावे लागले.