वैजापूर (गणेश निंबाळकर : सीएससीएन वृत्तसेवा) : चारशेहून अधिक शेतकरी सहा दिवसांपासून वैजापूर बाजार समितीत बेमुदत उपोषण करत आहेत. मात्र दखल न घेतल्याने आज, १६ जानेवारीला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनकर्त्या काही शेतकऱ्यांनी शोलेस्टाइल आंदोलन सुरू केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सायंकाळी पाचपर्यंत आंदोलन सुरूच होते. बाजार समितीचे अधिकारी आणि प्रशासनाचे अधिकारी शेतकऱ्यांची समजूत काढत आहेत. मात्र पैसे मिळेपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे मोठाच पेच निर्माण झाला आहे.
काय आहे प्रकरण…
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील साई बालाजी ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी सागर सुनील राजपूत याने चारशेहून अधिक शेतकऱ्यांचा कांदा विकत घेतला, पण पैसे दिलेच नाहीत. हा आकडा दोन कोटींच्या घरात आहे. चार महिन्यांपासून पैसे मिळत नसल्याने हतबल शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात सहा दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र तोडगा निघत नसल्याने आज सकाळीच काही शेतकऱ्यांनी आक्रमक रुप धारण करत पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका व पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सायंकाळपर्यंत आंदोलन सुरूच आहे. आंदोलनस्थळी नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. गर्दीला आवरताना आणि शेतकऱ्यांची समजूत काढताना प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत सुरू आहे.
आ. बोरनारेंची मध्यस्थी निष्फळ…
कांदा विक्री केलेल्या तालुक्यातील ४०६ शेतकऱ्यांना ४० दिवसांत म्हणजेच १० जानेवारी २०२५ पर्यंत पैसे देण्याचे लेखी आश्वासन बाजार समिती प्रशासनाने दिले होते. आ. प्रा. रमेश बोरनारे यांनी त्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे आंदोलन सुरू आहे. बाजार समितीने फिर्यादी होत राजपूतविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. आ. बोरनारे यांनी शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे बुडणार नाही, असे म्हणत स्वतः बाजार समितीची हमी घेतली होती.