छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नगरनाक्यापासून केंब्रिज चौकापर्यंत वाहनधारकाला कुठेही सिग्नलवर थांबण्याची वेळ येणार नाही. त्याला ग्रीन सिग्नलच लागलेला दिसेल, अशी व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. सिग्नलचे टायमिंगच तसे सेट करण्यात येणार आहेत. यामुळे वेळही वाचेल अन् प्रदूषणही कमी होईल.
सिग्नल उभारण्याची जबाबदारी महापालिकेकडे असते. शहरात महापालिकेने ४२ सिग्नल उभारले आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या जालना रोडवरील सिग्नलकडे यंत्रणेचे विशेष लक्ष असते. सध्या जालना रोडवरील सिग्नलचे टायमिंग वेगवेगळे असल्याने एक सिग्नल ग्रीन मिळाला तर पुढचा ग्रीनच मिळेल याची शाश्वती नसते. मात्र नव्या पद्धतीत एक सिग्नल ग्रीन मिळाला तर पुढील सर्व सिग्नल ग्रीनच मिळतील, अशी व्यवस्था होणार आहे. मात्र वेग कमी- जास्त झाला तर सिग्नल चुकणारआहेत. जालना रोडवर सध्या १३ सिग्नल आहेत. यात नगरनाका, महावीर चौक, जिल्हा न्यायालय, क्रांतीचौक, अमरप्रीत, मोंढानाका, आकाशवाणी, सेव्हन हिल, खंडपीठ, वसंतराव नाईक चौक, मुकुंदवाडी, धूत हॉस्पिटल, केंब्रिज चौक या चौकात सिग्नल आहेत.
अत्याधुनिक १४ सिग्नल…
महापालिकेने शहरात १४ अत्याधुनिक सिग्नल बसविले असून, लवकरच हे सर्व नवीन सिग्नल सुरू होतील, अशी माहिती मनपाच्या विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता मोहिनी गायकवाड यांनी पत्रकारांना दिली. १ जानेवारीला गजानन महाराज चौकातील सिग्नलची टेस्टिंग घेण्यात आली होती. राष्ट्रीय शुद्ध हवा योजनेच्या निधीतून ९ ठिकाणी तर मनपा निधीतून ५ ठिकाणी अशा १४ ठिकाणी स्मार्ट सिग्नल बसविले आहेत. विशेष म्हणजे, उद्धवराव पाटील चौक, धूत हॉस्पिटल येथील टी पॉइंट आणि केम्ब्रिज चौक या ठिकाणी प्रथमच सिग्नल बसविले आहेत. वाहतुकीला शिस्त लागण्यासोबतच सिग्नलवर प्रदूषण कमी व्हावे या दृष्टीने प्रत्येक चौकाचा अभ्यास यासाठी करण्यात आला आहे.
पोलीस नाहीत, सिग्नलही बंद…
शहरातील १० चौकांतील सिग्नल सुस्थितीत असूनही बंद ठेवले जात आहेत. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याचे कारण पोलीस विभागाकडून दिले जाते. परिणामी मोंढा नाका, चंपा चौक, सिल्लेखाना चौक, टेलिफोन भवन चौक, आमखास मैदानाजवळील सिटी क्लब, जवाहरनगर पोलीस स्टेशनसमोरील चौक, एसबीओए शाळेसमोरील चौक, कोकणवाडी चौक यासह १० चौकांतील सिग्नल बंद ठेवले जातात.