वैजापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरातील दत्तनगर येथील ४५ वर्षीय महिलेने ११ जानेवारीला सायंकाळी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे आता समोर आले आहे. वैजापूर पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शोभा विश्वनाथ ठोकळ (वय ४५, रा. दत्तवाडी, वैजापूर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. राहुल अंबादास गजबे (रा. इंदिरानगर) असे त्यांना त्रास देणाऱ्याचे नाव आहे. राहुल त्यांना त्रास देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून शोभा ठोकळ यांनी आत्महत्या केली. त्या गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर नागरिकांनी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले होते.
जायकवाडी धरणात ३७ वर्षीय युवक तर बालानगरात ३२ वर्षीय युवती आढळली मृतावस्थेत
पैठण शहरातील इंदिरानगर येथील विक्रम भानुदास पोटफोडे (३७ रा. इंदीरानगर पैठण) यांचा मृतदेह बुधवारी (१५ जानेवारी) दुपारी दीडच्या सुमारास जायकवाडी धरणाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत. दुसऱ्या एका घटनेत पैठण तालुक्यातील बालानगर येथे रुणीदेवी रमणी सहानी (वय ३२) ही मूळची बिहारची महिला बुधवारी दुपारी एकला बेशुद्धावस्थेत आढळली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी घेतली आहे.