छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : उस्मानपुऱ्यातील म्हाडाच्या जुन्या अपार्टमेंटमधील तळमजल्याच्या तीन खोल्यांच्या फ्लॅटमध्ये चार रूममेटसह राहणाऱ्या बीसीएसच्या १९ वर्षीय विद्यार्थ्यावर मारेकऱ्यांनी १७ वार केल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत समोर आले. त्याचे मारेकरी कोण हे बुधवारी समोर आले नाही, पण उस्मानपुरा पोलिसांनी चार रूममेटसह २० मित्रांची कसून चौकशी केली. त्यांच्या चौकशीतून हत्याऱ्यांचे धागेदोरे जुळविण्याचा प्रयत्न झाला.
प्रदीप विश्वनाथ निपटे (मूळ रा. पिंपरखेड, ता. वडवणी, जि. बीड) असे हत्या झालेल्या या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याची मंगळवारी (१४ जानेवारी) तो राहत असलेल्या फ्लॅटवर हत्या झाली होती. प्रदीप सहा महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आला होता. त्याचे वडील शेती करतात. तो देवगिरी महाविद्यालयात बीसीएसच्या प्रथम वर्षात शिकत होता. तो आधी दशमेशनगरात खोली घेऊन राहत होता. दहा दिवसांपूर्वीच उस्मानपुऱ्यातील म्हाडा कॉलनीतील अपार्टमेंटमध्ये मित्रांसोबत फ्लॅटमध्ये राहायला आला होता.
रूममेट्सच्या जबाबानुसार, सायंकाळी सहाच्या सुमारास ते प्रदीपला सोडून सर्व बाहेर पडले होते. रात्री आठला मेसवाल्याने दारासमोर डब्बा ठेवून दिला. रात्री साडेनऊला पहिला रूम पार्टनर परतला. रात्री दहाला इतर ३ रूम पार्टनर परतले. रात्री सव्वा दहाला जेवणासाठी प्रदीपला त्यांनी आवाज दिला, मात्र त्याने आवाज दिला नाही. एकाने अंगावरील पांघरूण ओढले असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रदीप दिसला. त्यानंतर लगेचच पोलिसांना कळविण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक अतुल येरमे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी चौरे यांच्यासह ४ पथके हत्येचा तपास करत आहेत.
अनोळखी तिघे संशयास्पद स्थितीत फिरत होते…
११ जानेवारीला प्रदीपचे कॉलेजमध्ये एकमेकांना खुन्नस देण्यावरून काही मुलांसोबत भांडण झाले होते. प्राध्यापकांनी ते भांडण सोडवले होते. मात्र त्या दिवशीपासून तो फ्लॅटबाहेर पडला नव्हता. हा प्रकार त्याने गावाकडच्या मित्रांना सांगून मदतही मागितली होती, असे नातेवाइकांनी सांगितले. सायंकाळी सहा ते रात्री १० च्या दरम्यान अनोळखी तिघे संशयास्पद स्थितीत या भागात फिरताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसले आहेत. तेच मारेकरी असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला. महाविद्यालयातील भांडण, अन्य मित्र, मैत्रिणींसोबतच्या वैयक्तिक वादाच्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. मारेकऱ्यांनी जाताना प्रदीपचा मोबाइल सोबत नेल्याने नशेखोरी, लुटमारीसाठी तर खून झाला नाही ना, या दृष्टीनेही तपास केला जात आहे.
एकाच शस्त्राने वार…
प्रदीप तसा शांत स्वभावाचा होता. त्याला कराटे, ज्युडोची आवड होती. त्याने यात ब्लॅक बेल्ट मिळवला होता. प्रदीप बेडरूममध्ये झोपलेला असावा. घराचा दरवाजा उघडाच असल्याने मारेकऱ्यांनी प्रवेश करून त्याच अवस्थेत त्याच्या गळ्यावर वार केल्याचा संशय आहे. त्याच्या गळा, छाती, मान व डोक्यात एकूण १७ वार आहेत. सर्वाधिक खोल वार डोक्यात तर एक पाठीत आहे. हे सर्व वार एकाच शस्त्राने झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.