छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी चालू वर्ष गुंतवणुकीचे ठरणार आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या बिडकीन औद्योगिक पट्ट्यात लिथिनिअम बॅटरी सेल उत्पादन करणाऱ्या जेनसोल ग्रुपच्या अवनी पॉवर कंपनीने तब्बल १० हजार ५२१ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी केली असून, जपानची त्सुशो कॉर्पोरेशन आणि ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनल कंपनी आणि जर्मनीच्या सिमेन्स कंपनीनेही गुंतवणुकीचा विचार सुरू केला आहे. नवे २२ उद्योग बिडकीन डीएमआयसीत येण्याची शुभलक्षणे दिसू लागली आहेत.
गेल्यावर्षी टोयोटा किर्लोस्कर मोटार्ससह जेएसडब्ल्यू, लुब्रिझोल आणि एथर एनर्जी कंपनीने प्रकल्प उभारण्याचे जाहीर केले. त्यानंतर यंदा किमान दोन डझन उद्योग येतील,अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. बिडकीन औद्योगिक पट्ट्यात आता केवळ ४६९ एकर ३९ गुंठे जमीन उरली असून, मोजकीच औद्योगिक जमीन उपलब्ध असतानाही जपानच्या त्सुशो कॉर्पोरेशन कंपनीने ७५ एकर जमिनीची मागणी करत ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. टोयोटा- किर्लोस्कर मोटार्स ८१७ एकरवर प्रकल्प साकारणार आहे. आता स्किल ट्रेनिंग सेंटर उभारण्यासाठी त्यांनी ५० एकर जमिनीची वाढीव मागणी केली आहे.

असा उपलब्ध होणार रोजगार…
-त्सुशो कॉर्पोरेशन कंपनी बिडकीनमध्ये ६५० लोकांना रोजगार उपलब्ध करणार आहे.
-जपानी कंपनी ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक इंटरनॅशनलला ५८ एकर जमिन हवी आहे. ते ४ हजार कोटी गुंतवणार असून, यातून ३ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत.
-अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील मॅट्रिक गॅस कंपनीला १३६ एकर जमिन हवी आहे. ही कंपनी तब्बल ९ हजार कोटींची गुंतवणूक करणार असून, ४ हजार जणांना रोजगार यातून मिळणार आहे.
-जर्मनीच्या सिमेन्स कंपनीला २५ एकर जमिन हवी आहे. ही कंपनी २५०० कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही कंपनी किमान १ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
या कंपन्याही येण्याची शक्यता… (कंपनी अन् गुंतवणूक रक्कम कोटींत)
निप्पोन एक्स्प्रेस लॉजिस्टिक लि. (१०० कोटी), महिंद्रा एस्सीलो (३०० कोटी), फिंडाबिलटी सायन्सेस प्रा.लि. (२० कोटी), ह्योसंग कॉपेरिशन प्रा.लि. (२५२० कोटी), मरुबेनी-इटोची स्टील इंडिया.प्रा.लि. (२०० कोटी), एमटीसी ग्रुप (३,००० कोटी), रेलिक मटेरियल प्रा.लि. (५० कोटी), इंडो ऑटो टेक प्रा.लि. (३०० कोटी), केमबॉण्ड मटेरिअल टेक्नॉलॉजी प्रा.लि (१२५ कोटी), ट्रेक्स् एनर्जी प्रा.लि. (१००० कोटी), ट्रान्ससिस्टम लॉजिस्टिक प्रा. लि. (३५० कोटी).