छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : थेट मीडियासमोर येऊन माजी खासदार चंद्रकांत खैरे हे अंबादास दानवे यांच्यावर आरोप करत असतात. दोघांतील गटबाजी वारंवार चव्हाट्यावर येत असते. या सर्व गोष्टीला आ. अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना जबाबदार धरले असून, ते म्हणाले, की मी माझे काम करत असतो, चंद्रकांत खैरे त्यांचे काम करतात. आम्ही कधीही एकमेकांना त्यांच्या कामापासून थांबवले नाही. मात्र, शिवसैनिक फार कलाकार आहेत. तेच आमचे दोघांचेही कान भरण्याचा प्रयत्न करतात. मी एका कानाने ऐकून एका कानाने सोडून देतो. चंद्रकांत खैरे यांचे आता वय झाले आहे. ते पदाधिकाऱ्यांचे ऐकून घेतात… अशा शब्दांत त्यांनी दोघांच्या भांडणाचे खापर शिवसैनिकांवर फोडले.

ठाकरे गटाला छत्रपती संभाजीनगर शहरात लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी शहरातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर खैरे आणि दानवे यांना ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. त्यानंतर दोघांनी एकत्र येऊन आज, ११ जानेवारीला सकाळी छत्रपती संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात जिल्ह्यातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा मेळावा घेतला. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रथमच सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी यानिमित्ताने एकत्र आले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर स्वबळावर ठाकरे गटाचा भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली. सभेला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी आमदार उदयसिंह राजपूत, शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, राजू शिंदे, दिनेश परदेशी, दत्ता गोर्डे, महानगर प्रमुख राजू वैद्य व महिला आघाडी जिल्हा संघटिका आशाताई दातार यांची प्रमुख उपस्थिती होती. दानवे आणि खैरे यांनी सभेला मार्गदर्शन केले.

खैरे म्हणाले, की पैशाच्या आमिषापोटी काही पदाधिकाऱ्यांनी आपले इमान गद्दार गटाच्या हाती विकले. दोन वेळेस एकाच घरात छत्रपती संभाजीनगरचे महापौरपद दिलेल्या माजी महापौराने शिवसेनेशी गद्दारी केली. मंत्री संजय शिरसाट यांची गुलामी करण्यासाठी या महापौराने शिवसेना सोडली, अशी टीका खैरे यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत वाटलेला पैसा कुठून आणला, असा सवालही त्यांनी केला. आ. दानवे म्हणाले, की पक्षाच्या उमेदवारांनी विधानसभा निवडणूक जिद्दीने लढवली. शिवसैनिकांनी परिपक्वतेने खोट्या पक्षांतराच्या बातम्या समजून घेतल्या पाहिजे, माध्यमांच्या चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. सर्वसामान्य शिवसैनिकापासून मोठमोठ्या पदापर्यंत घेऊन जाणाऱ्या शिवसेनेशी गद्दारी करण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही. शिवसेनेची गद्दारी केलेले लोकं मुख्यमंत्री झाले. परंतु जनमानसात त्यांना कधीच सन्मान मिळू शकत नाही. शिवसेनेचा शाखाप्रमुख हा फुलटाईम काम करणारा पदाधिकारी आहे.

आगामी काळात तरुणांना पक्षात नेतृत्व दिले गेले पाहिजे. आगामी काळात पक्षाची नव्याने संरचना करण्यात यावी, अशी माझी इच्छा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरे गटाला विधानसभा निवडणूक लढविलेल्या मतदारसंघात ५ लाख २८ हजार मतदान झाले. ठाकरे गटाने हिंदुत्व सोडल्याचे एक तरी उदाहरण दाखवावे. पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे देशातील प्रथम असे मुख्यमंत्री आहेत ज्यांनी राज्याच्या विधान भवनात हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली. संघाचे लोक आता थेट पुढच्या विधानसभा निवडणुकीला बाहेर येतील. अल्प काम करायचे आणि भलं मोठं केले असल्याचे दाखवयाचे ही संघाची पद्धत आहे. भारतीय जनता पक्षातील अनेक जण हिंदुत्व आमच्या रक्तात असल्याचे म्हणत असताना त्यांच्यातीलच काही लोक गोमांस खाण्याचे समर्थन करतात. असे हिंदुत्व भाजपाला मान्य आहे का? असा सवालही आ. दानवे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी अजमेरा शरीफ दर्ग्याला चादर पाठवली तर हिंदुत्व बुडले असे भारतीय जनता पक्ष प्रचार करतो. आता त्यांच्या पक्षाचे नेते आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच दर्ग्याला चादर पाठविली, तेव्हा यांचे हिंदूत्व बुडाले नाही का?, असेही दानवे म्हणाले.
