कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : कन्नडचे माजी नगरसेवक कैलास जाधव यांच्यावर कन्नड शहरातील पिशोर नाक्यावर गुरुवारी (९ जानेवारी) सायंकाळी साडेसातला चार जणांनी अचानक हल्ला चढवला. हल्ल्यात जाधव गंभीर जखमी असून, त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कन्नड शहर पोलिसांनी हल्लेखोर ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कन्नड शहर पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की अंधानेर येथील शेती काम आटोपून मोटरसायकलीवर बसून घरी येत असताना पिशोर नाका येथील तिरुपती हॉस्पिटलसमोर त्यांना जाबीर रशीद शेख व त्याच्या साथीदारांनी अडवले. हा तुझ्या बापाचा रस्ता आहे का, असे म्हणत त्यांनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर लाथा- बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. जाबीर शेखने त्याच्या हातातील फायटरने डोक्यात मारले. त्यानंतर जाधव बेशुद्ध पडले. नागरिकांनी त्यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी करत आहेत.