गंगापूर (सीएससीएन वृत्तसेवा) : शरद पवार गटाचे गंगापुरातील पदाधिकारी ॲड. महेंद्र राऊत यांना शुक्रवारी (१० जानेवारी) सकाळी फोनद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकी देणाऱ्याने ४५ हजार रुपये मागितले. गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ॲड. राऊत यांनी तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.
राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे, की शुक्रवारी दुपारी ११ ते १२ च्या दरम्यान त्यांना अनोळखी नंबरवरून पाच ते सहा वेळा कॉल आला. वारंवार कॉल येत असल्याने राऊत यांनी उचलला असता, तुम्ही राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकारी आहात. तुम्ही कोठे जाता-येता मला माहीत आहे. विरोधी पक्षाने तुमची सुपारी दिली असून उद्या तुमची हत्या होणार आहे. मला ४५ हजार रुपये पाठवले तरच तुम्ही वाचू शकाल, अशी धमकी या कॉल करणाऱ्याने दिली. अधिक तपास सहायक फौजदार दिनकर थोरे करत आहेत.