छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या प्रमुख मागणीसाठी १९ जानेवारीला छत्रपती संभाजीनगरात सर्वधर्मीय, सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाला सकाळी १० वाजता क्रांती चौकातून सुरुवात होईल. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सांगता होईल.
मोर्चाच्या आयोजनाबाबत सिडको एन ३ येथील छत्रपती महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी सहाला बैठक झाली. बैठकीला सर्व समाजांतील बांधव, पक्ष, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चाचे बॅनर सर्वत्र लावले जाणार असून, सोशल मीडियावर प्रचार व प्रसार करून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी समन्वयकांची नियुक्ती केली जाणार आहे. १० दिवस अभियान राबवून मोर्चात सहभाग वाढवला जाणार आहे.