छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १० वा अजिंठा- वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान प्रोझोन मॉलमधील पीव्हीआर-आयनॉक्स थिएटरमध्ये होणार आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत हा महोत्सव होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमा महोत्सवात दाखवले जाणार असून, पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रुपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे. फेस्टिव्हलचा समारोप १९ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता पीव्हीआर आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे. सुप्रसिध्द नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान, ऑस्कर विजेते साऊड डिझायनर रसूल पुक्कूट्टी व आयोजन समितीचे मानद अध्यक्ष प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनांबरोबरच विविध कार्यक्रम होतील. यात १६ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची ‘स्वदेसची वीस वर्षे…’ ही प्रकट मुलाखत होणार आहे. प्रसिध्द नाट्य व चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे त्यांच्याशी संवाद साधतील. १७ जानेवारीला दुपारी १२ वाजता ओटीटी माध्यमांवरील बदलता सिनेमा या विषयावर परिसंवाद होईल. यात विविध भारतीय भाषांमधील चित्रपट दिग्दर्शकांचा सहभाग राहील. याच दिवशी सायंकाळी ६ वा. ‘मराठी भाषा अभिजात दर्जा व मराठी चित्रपट’ या विषयावर परिसंवाद होईल. यात लेखिका लतिका पाडगावकर, प्रसिध्द अभिनेते सुबोध भावे, लेखक क्षितिज पटवर्धन, चित्रपट महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सांवलकर, प्रसिध्द दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे.
१८ जानेवारीला दुपारी १२ वा. ‘आधुनिक सिनेमातील तंत्र भाषा’ या विषयावर परिसंवाद होईल. यात ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुक्कूट्टी, ज्येष्ठ छायाचित्रकार सी. के. मुरलीधरन, ज्येष्ठ संकलक दिपा भाटीया, ज्येष्ठ दिग्दर्शक जो बेबी यांचा सहभाग असणार आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे या चर्चेचे संवादक असतील. १८ जानेवारीला सायंकाळी ६ वा. भारतीय सिनेमा स्पर्धा गटातील चित्रपट दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे. १९ जानेवारी रोजी सकाळी १० वा. इंडिया फोकस या चित्रपट विभागातील दिग्दर्शकांसमवेत चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे. १९ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वा. हिंदी सिनेमांमधील प्रसिध्द नृत्य व चित्रपट दिग्दर्शिका फराह खान यांच्या मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक जयप्रद देसाई हे त्यांच्याशी संवाद साधतील.