छत्रपती संभाजीनगर (कल्याणी नागोरे : सीएससीएन वृत्तसेवा) : तब्बल ६५ लाख रुपये खर्चून छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषदेची नवी आकर्षक, अलिशान अन् हायटेक इमारत साकारत आहे. २०२२ सुरू झालेले काम आता अंतिम टप्प्यात आहे. जवळपास अडीच वर्षे या इमारतीच्या कामाला लागले. २६ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन होईल अशी शक्यता होती, मात्र बरीच कामे बाकी असल्याने उद्घाटन सोहळा कधी होईल हे तूर्त तरी अनिश्चित आहे. या भव्यदिव्य इमारतीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्याशी छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजने साधलेला संवाद…

प्रश्न : जिल्हा परिषदेची नवी वास्तू किती मजली आहे?
विकास मीणा : ही वास्तू ग्राउंडफ्लोअर प्लस तीन फ्लोअर अशी एकूण चार मजली आहे. त्यामध्ये ग्राउंड फ्लोअरवर सर्व पदाधिकाऱ्यांची व वित्त विभागाचे ऑफिस आहे. ज्या विभागांत लोकांची सर्वात जास्त वर्दळ असते असे विभाग तळ मजल्यावर ठेवले आहेत. इतर वेगवेगळे विभाग वरच्या मजल्यावर असतील.
प्रश्न : अध्यक्ष व सभापतींची कार्यालयं कुठे असतील?
विकास मीणा : अध्यक्ष व सभापती यांचे कार्यालयसुद्धा ग्राउंड फ्लोअरवर आहेत. याबरोबरच स्टॅंडिंग मीटिंग हॉलही तळ मजल्यावर आहे. चौथ्या मजल्यावर जनरल बॉडी मिटींग हॉल असेल. यात सर्व पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य असतात. त्यामुळे ते आपण चौथ्या मजल्यावर ठेवलेले आहे.

प्रश्न : वास्तुभारणीसाठी किती खर्च करण्यात आला ?
विकास मीणा : संपूर्ण वास्तूसाठी ४७ कोटींचे प्रपोजल होते, यानंतर वाढीव १२ कोटी आले. ६ कोटी जिल्हा परिषद सेसमधून निधी ठेवला असून एकूण ६५ कोटींचा हा प्रोजेक्ट आहे. अग्निशमन यंत्रणेने सुसज्ज ही वास्तू असणार आहे. एखादी आगीची घटना झाल्यास लगेच पाण्याचा शिडकावा होऊन अलार्म वाजेल. कॉरिडॉर, हॉलमध्येही अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे.
प्रश्न : वास्तूचे काम कधी सुरू केले व कधी पूर्णत्वास येईल?
विकास मीणा : काम २०२२ ला प्रत्यक्षात सुरू झाले. जवळपास दोन- अडीच वर्षांत बांधकाम झाले आहे. आज रोजी आपण सगळे स्ट्रक्चर पूर्ण केले आहे. सगळे इलेक्ट्रिकल काम झालेले आहे. ग्राउंड फ्लोरिंगचे काम झाले आहे. प्लास्टर होऊन काम अंतिम टप्प्यात आहे. आता फक्त रंगरंगोटी, थोड्याप्रमाणात प्लम्बिंग, खिडक्या व दरवाजे लावण्याचे काम बाकी आहे. पुढील १ ते दीड महिन्यात हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रश्न : वाहनतळाची काय सुविधा असेल?
विकास मीणा : सध्या जशी मोकळ्या जागेत पार्किंगची व्यवस्था आहे, तशीच राहणार आहे.
प्रश्न : या वास्तूचे उद्घाटन कधी होईल?
विकास मीणा : बारा कोटींची सुधारित मान्यता आणि त्याच्या संदर्भात टेंडरची मान्यता भेटलेली आहे. सहा कोटी आम्ही जो जिल्हा परिषद सेसमधून दिलेला आहे याचे काम कोणाकडून करून घ्यायचं या संदर्भात शासन स्तरावर मान्यतेसाठी प्रस्ताव प्रलंबित आहे. मधल्या काळामध्ये निवडणूक झाल्यामुळे मंत्रिपदावर कोणीच नव्हते. आता मंत्र्यांची निवड झालेली आहे. ग्रामीण विकासमंत्र्यांच्या मान्यतेसाठी फाईल थांबली आहे. त्यांची मान्यता भेटताच लगेच आपण काम पूर्ण करून मंत्र्यांच्या सोयीनुसार उद्घाटन करू.
२०२१ मध्ये झाले होते भूमिपूजन…
जिल्हा परिषदेची औरंगपुरा परिसरातील प्रशासकीय इमारत निजामकालीन वास्तूमध्ये होती. ही वास्तू जीर्ण झाल्यामुळे सन २००१ पासून नवीन इमारत उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या इमारतीचा कोनशिला समारंभही झाला होता. १७ सप्टेंबर २०२१ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन झाले होते. आता इमारत पूर्णत्वाला आली आहे.
कोणत्या मजल्यावर काय…
-तळमजला १८,५३८ : चौरस फुटांचा असून, त्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापती, शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण विभाग, स्थायी समिती हॉल, गोदाम, महिला, पुरुष, अपंगासाठी स्वच्छतागृह आहे.
-पहिला मजला : १९,९२६ चौरस फुटांचा असून, त्यात आरोग्य, वित्त, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा, बांधकाम, सर्व शिक्षा अभियान, निरंतर शिक्षण विभागाची कार्यालये आहेत.
-दुसरा मजला : १८,९८९ चौरस फुटांचा असून मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, बैठक हॉल, वित्त, पेन्शन, कृषी, पंचायत, यांत्रिकी विभाग, व्हिडीओ कॉन्फरन्स हॉल आहे.
-तिसरा मजला १९, ७३१ चौरस फुटांचा असून, त्यात स्वच्छ भारत मिशन, रोहयो, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन विभागाचे कार्यालय आहे.