छत्रपती संभाजीनगर (कल्याणी नागोरे : सीएससीएन वृत्तसेवा) : शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन विभागाचे मनुष्यबळ तोकडे असले तरी, लवकरच उर्वरित पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती देताना शहराचे मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा पाटील यांनी शहरात लवकरच १०० मनुष्यबळ भरण्यात येणार असून, यात महिला फायर फायटरचाही समावेश असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजीनगर सिटी न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
श्री. पाटील यांनी सांगितले, की सध्या अग्निशमन विभागातील मनुष्यबळ कमी आहे. ३६६ फायर फायटरची आवश्यकता आहे. यातील ५० टक्केही स्टाफ नाही. आता आपल्याकडे १६२ च फायर फायटर आहेत. पुढील ३ ते ४ महिन्यांत १०० मनुष्यबळ भरती करण्यात येईल. यात महिला फायर फायटरचाही समावेश असेल, असे ते म्हणाले. अग्निशमन विभागाला आग विझविण्याशिवाय, रेस्क्यू कॉल, बिल्डिंग कोसळणे, पाणी साचणे, केमिकल आगी, गॅस लिकेज, रुग्णवाहिका कॉल, स्टँडबाय ड्युटी कॉल, व्हीआयपी बंदोबस्त व इतर आपात्कालीन कॉल असतात. आम्हाला तत्परतेने धाव घेऊन लोकांना सुरक्षित करण्याचे काम करावे लागते.
सध्या शहरात एकूण ५ फायर स्टेशन असून, पदमपुरा येथील मुख्य फायर स्टेशनव्यतिरिक्त सिडको, चिकलठाणा, सिडको एन ९, कांचनवाडी येथे फायर स्टेशन आहेत. साहित्य आणि बंब सध्या कमीच आहेत. आम्ही सरकारकडे मागणी केली आहे. लवकरच रेस्क्यू व्हेईकल, एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन याशिवाय पुढील ३-४ महिन्यात आपण ७० मीटरपर्यंत पोहोचणारे एरियल लॅडर प्लॅटफॉर्म घेणार आहोत. याव्यतिरिक्त २९ मीटरपर्यंत पोहोचणारी एरियल लॅडर प्लॅटफॉर्म वाहने इन्स्पेक्शन करण्यासाठी मी नुकताच मुंबईला गेलो होतो, असे ते म्हणाले. अग्निशमन विभागाला अलर्ट कसा मिळतो, याबद्दल विचारले असता रायबा पाटील म्हणाले, की कॉल ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर लगेच जवळील फायर स्टेशनची यंत्रणा अलर्ट होते आणि तातडीने संबंधित जागी पोहचतात, असे त्यांनी सांगितले.