छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : विभागीय क्रीडा संकुलाचे २१ कोटी ५९ लाख ३८ हजार रुपये हडपणाऱ्या दोघा कंत्राटी कामगारांच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पदवीपर्यंत शिकलेल्या आणि १३ हजार रुपये पगार असलेल्या कंत्राटी लिपिक हर्षकुमार अनिल क्षीरसागर (वय २३, रा. बीड बायपास) याने गेल्या ११ महिन्यांत विभागीय क्रीडा संकुलासाठी आलेल्या पैशांतून स्वतःच्या व प्रेयसीच्या नावाने कोट्यवधी रुपयांचे अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट्स खरेदी केले. विदेशी बनावटीच्या गाड्याही खरेदी केल्या. एका सराफाला सोने खरेदीसाठी मोठी रक्कम देऊन तो फरारी झाला आहे. दुसरी अटकेत असलेली त्याची मैत्रीण आणि त्याच्यासोबत कंत्राटी लिपिक म्हणून काम करणारी यशोदा शेट्टी हिच्यावर त्याने मोठी उधळपट्टी केली. तिच्या खात्यात पैसे जमा करण्यासह तिचा पती जीवन कार्यप्पा विंजडा ऊर्फ बी. के. जीवन याच्या नावावर त्याने २७ लाखांची चारचाकी खरेदी केल्याचेही समोर आले.
हर्षकुमार व यशोदा शेट्टी हे दोघे लेखा लिपिक म्हणून कंत्राटी पद्धतीने दिशा फॅसिलिटीज कंपनीमार्फत नियुक्त झाले होते. त्यांच्याकडे कॅशबुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेशी पत्रव्यवहार, खात्याचे स्टेटमेंट मागविणे, रेकॉर्ड ठेवण्याची कामे देण्यात आली होती. विभागीय क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. संकुलाच्या क्रीडा समितीच्या खात्यात २०२३-२०२४ या कालावधीसाठी ५९ कोटी ७ लाख ८२ हजार रुपयांचा निधी जमा होता. पैकी ३७ कोटी ७१ लाख ८२ हजार रुपये खर्च झाले. उरलेल्या २२ कोटी ८९ लाख १० हजार ४७३ रुपयांपैकी २१ कोटी ५९ लाख ३८ हजार २८७ रुपयांवर हर्षकुमारने डल्ला मारला. त्याची सहकारी यशोदा त्याची चांगलीच ‘मैत्रीण’ बनली होती. यशोदाचा पती जीवनच्या नावावर हर्षकुमारने १.६७ कोटी रुपये पाठविले.
यशोदाच्या खात्यावरही २.५० लाख रुपये पाठविले. जीवन डबे पुरविण्याचे व्यवसाय करतो. हर्षकुमारला संगणक, ऑनलाइन व्यवहार याबाबत चांगले ज्ञान आहे. त्याने मूळ ई-मेल आयडीप्रमाणेच एका शब्दात बदल करून दुसरा ई-मेल आयडी तयार केला. क्रीडा उपसंचालकांच्या जुन्या लेटरहेडच्या माध्यमातून त्याच ई मेलआयडीद्वारे बँकेला नेट बँकिंग सुरू करण्यासाठी ई-मेल केला. स्वतःचा मोबाइल नंबरही नेट बँकिंगसाठी दिला. त्याद्वारे त्याला खात्यातून पैसे हडपणे सोपे गेले. कारण येणारे ओटीपी त्याच्या मोबाइल आणि ई-मेल आयडीवर येत होते. रविवारी हा घोटाळा समोर आल्यानंतर पूर्वीचे उपसंचालक व सध्या पुणे येथे कार्यरत सुहास पाटील सोमवारी तत्काळ छत्रपती संभाजीनगरला दाखल झाले. त्यांनी दिवसभर कार्यालयात फायलींची तपासणी केली.
प्रेयसीला फ्लॅट गिफ्ट…
गेल्या ४ महिन्यांत हर्षकुमारने १.३० कोटींची बीएमडब्ल्यू कार, ३२ लाखांची बीएमडब्ल्यूची दुचाकी, यशोदाचा पती जीवन कार्यप्पा विंजडा ऊर्फ बी. के. जीवनच्या नावावरही २७ लाखांची कार खरेदी केली. विमानतळ परिसरातील एका आलिशान सोसायटीत नुकताच एक चार बेडरूमचा अल्ट्रा लक्झरियस फ्लॅट स्वतःच्या नावे तर दुसरा २ बेडरूमचा आलिशान फ्लॅट प्रेयसीच्या नावावर खरेदी केला आहे. त्याच्या एका बँक खात्यात ३ कोटींची एफडी सापडली असून, ४ बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत, तर बीएमडब्ल्यू कार पोलिसांना सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सापडली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अशोक अवचार यांनी यशोदा व तिचा पती जीवन यांना सोमवारी (२३ डिसेंबर) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यशोदा न्यायालयात ढसाढसा रडत होती. हर्षकुमार एसयूव्ही कार घेऊन फरारी झालेला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.