नागपूर (सीएससीएन वृत्तसेवा) : घटना नागपूर शहरातील आहे. अल्पवयीन प्रेयसीने गार्डनमधला प्रियकरासोबतचा व्हिडीओ एक गीत घालून इन्स्टाग्रामवर टाकल्याने प्रियकर चांगलाच अडचणीत सापडला आहे. ती बारावीत शिकते, तर तो बी. ए. तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. व्हिडीओ तिच्या भावाने पाहिल्यानंतर कुटुंबीयांना प्रेमप्रकरणाची माहिती झाली. तिला घरच्यांनी विचारले असता प्रेम डोक्यात शिरलेल्या मुलीने आमचे प्रेम असून, लवकरच लग्न करणार आहोत आणि आमच्यात शारीरिक संबंधही झाल्याची कबुली दिली. मुलगी अल्पवयीन असल्याने कुटुंबीयांनी सरळ कपीलनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी तिच्या प्रियकराविरुद्ध आता बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नागपुरात समोर आली आहे. प्रतिक शैलेंद्र वक्ते (२३, रा, कपीलनगर) असे प्रियकराचे नाव आहे.
अल्पवयीन मुलीची दोन वर्षांपूर्वी प्रतिकसोबत ओळख झाली होती. दोघेही कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. दोघांचे कॉलेज एकाच रस्त्यावर असल्याने बोलणे होत होते. त्यातून मैत्री झाली. प्रतिक शिक्षण घेण्यासोबतच खासगी कंपनीत कामालाही जातो. तो तिला आर्थिक मदतही करत होता. दोघांच्या भेटीगाठी वाढून फेब्रुवारी २०२४ मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्याने तिला प्रेमाची मागणी घातली. तिलाही तो आवडत असल्याने तिनेही लगेच होकार भरला. मार्चमध्ये ‘सरप्राईज पार्टी’ असल्याचे सांगून त्याने तिला फिरायला नेले. एका ढाब्यावर तिच्यासोबत जेवण केल्यानंतर दोघांत शारीरिक संबंधही झाले. त्यानंतरही अनेकदा संधी मिळेल तसे दोघांत शारीरिक संबंध होऊ लागले.
ती अक्षरशः प्रतिकच्या प्रेमात वेडी झाली. दोघे फिरायला गेल्यानंतर बरेच व्हिडीओ, फोटो काढले. काही दिवसांपूर्वी तिने एका बगिच्यात दोघे फिरत असलेला व्हिडीओ इंस्टाग्रामवर टाकला. त्यात प्रेमाचे गीतही घातले. दोन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ तिच्या भावाने बघितला. त्याला धक्काच बसला. त्याने घरी सांगितले. कुटुंबियांनी तिला विचारणा केली. त्यावेळी तिने आमचे प्रेम असून लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितले. वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या कुुटुंबीयांनी तिला घेऊन कपीलनगर पोलीस ठाणे गाठले. मुलगी अल्पवयीन असल्याने मुलीची तक्रार लिहून घेत प्रतिकविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. त्याला पोलिसांनी तातडीने अटकही केली.