नवी दिल्ली : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज, २३ डिसेंबरला मोठा दणका दिला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने पूजाला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला.
दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकरविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी तिच्यावर नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा आणि ओबीसी आणि अपंग कोट्याचा लाभ बेकायदेशीरपणे दावा केल्याचा आरोप केला आहे. न्यायमूर्ती चंदर धारी सिंह यांच्या खंडपीठाने २७ नोव्हेंबर २०२४ रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान, न्यायालयाने अंतिम निर्णय होईपर्यंत खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण वाढवले आहे. खेडकर यांनी अधिवक्ता बीना माधवन यांच्यामार्फत तपासात सहकार्य करण्यास तयार असल्याचे सांगितले आणि कोठडीत चौकशीची गरज नसल्याचे सांगितले. तथापि, दिल्ली पोलिसांनी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट संजीव भंडारी यांच्यामार्फत न्यायालयाला माहिती दिली की तपास चालू आहे आणि मोठ्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी कोठडीत चौकशीची आवश्यकता असू शकते, तसेच कटाचे काही पैलू देखील समोर येणे बाकी आहे.
पूजाने श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. नंतर २०२१ मध्ये UPSC CSE परीक्षा ८४१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. प्रशिक्षणानंतर, तिना यावर्षी जून २०२४ मध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पहिली नियुक्ती मिळाली. मात्र, तिच्या पहिल्याच नियुक्तीमध्ये प्रशिक्षणादरम्यान तिची चौकशी झाली आणि दरम्यान तिची बदली झाली. वास्तविक कार्यालयात येण्यापूर्वीच पूजाने अवास्तव मागण्या केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती.
पूजावर आरोप
-पूजा खेडकरवर आरोप आहे की, प्रशिक्षण कालावधीत तिने सरकारी निवास, कर्मचारी, कार आणि स्वतंत्र केबिनची मागणी केली.
-तिच्या वैयक्तिक ऑडी कारवर लाल-निळे दिवे आणि महाराष्ट्र सरकारचा लोगो लावला.
-चोरीच्या आरोपात अटक केलेल्या ट्रान्सपोर्टरला सोडण्यासाठी तिने डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव आणला.
-आयएएस होण्यासाठी तिने खोट्या कागदपत्रांचा वापर केला आणि यूपीएससी फॉर्ममध्ये स्वत:ला ओबीसी नॉन-क्रिमी लेयर म्हणून घोषित केले.
-पूजा श्रीमंत कुटुंबातील आहे. ती स्वतः सुमारे १७ कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालक आहे.
-पूजाने अपंगत्व श्रेणी अंतर्गत यूपीएससी अर्ज भरला होता. ती ४० टक्के नेत्रहीन आणि ती काही मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र मेडिकल दरम्यान प्रत्येक वेळी ती हजर राहिली नाही.
-पूजावर एमबीबीएस कॉलेजमध्ये ॲडमिशनदरम्यानही कागदपत्रे खोटी केल्याचा आरोप आहे.