कुवेत सिटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जबर अल सबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. भारत आणि कुवेत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या योगदानामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा २० वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. नोव्हेंबरमध्येच गुयाना, डोमिनिका आणि बारबाडोसने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान दिला होता.
ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेटचा पुरस्कार जाणून घ्या
द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट (विसम मुबारक अल-कबीर) हा सन्मान १६ जुलै १९७४ रोजी कुवेत सरकारने १८९६ ते १९१५ या काळात देशाचे शेख मुबारक अल-सबाह यांच्या स्मरणार्थ स्थापित केला होता. मुबारक अल-सबाह यांनी १८९७ मध्ये कुवेतला ओटोमन साम्राज्यापासून स्वतंत्र देश म्हणून स्थापन केले. तेव्हापासून हा पुरस्कार जगभरातील अनेक मान्यवरांना देण्यात आला आहे.
दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान शनिवारी कुवेतला पोहोचले होते. कुवेतच्या अमीरच्या निमंत्रणावरून ते कुवेतला पोहोचले आहेत. गेल्या ४३ वर्षांत भारतीय पंतप्रधानांची या आखाती देशाला झालेली ही पहिलीच भेट आहे. यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी रविवारी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जबर अल-सबा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. ज्यात विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि ऊर्जा या क्षेत्रांमध्ये भारत-कुवैत संबंधांना नवीन चालना देण्यावर चर्चा झाली. यापूर्वी १९८१ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कुवेतला भेट दिली होती.
पंतप्रधान मोदींनी घेतली अनिवासी भारतीयांची भेट
पंतप्रधान मोदींनी शनिवारी एका भारतीय समुदायाच्या कार्यक्रमाला संबोधित केले आणि एका भारतीय कामगार शिबिरालाही भेट दिली. भारत हा कुवेतच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि भारतीय समुदाय हा कुवेतमधील सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. कुवेत हा भारताच्या प्रमुख व्यापार भागीदारांपैकी एक आहे आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार US$10.47 अब्ज होता. कुवेत हा भारताचा सहावा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार देश आहे, जो देशाच्या उर्जेच्या तीन टक्के गरजांची पूर्तता करतो.