छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : सत्तेत असूनही पाच वर्षे मंत्रिपदापासून सातत्याने डावलण्यात आल्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांनी ‘सामाजिक न्याय’ करत शिरसाट यांना मंत्री केले. त्यांनाच पालकमंत्रीही करण्यात येईल अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत मंत्रिपदापासून डावलण्यात आलेल्या अब्दुल सत्तार आणि त्यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात पहायला मिळत आहे. सत्तारांनी सुरू केलेल्या दबावाच्या राजकारणावर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी देव त्यांचं भलं करो, अशी प्रतिक्रिया दिल्याने भविष्यात हे शीतयुद्ध चांगलेच रंगणार असल्याची चर्चा आहे.
मागच्या सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री राहिले. सरकारच्या शेवटच्या काळात छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. शिरसाट यांना शेवटच्या टप्प्यात सिडकोचे अध्यक्षपद देऊन समाधान करण्यात आले होते. मात्र पुन्हा महायुतीची सत्ता आल्यानंतर मंत्रिपदासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आणि मंत्रिपद पदरातही पाडून घेतले. भाजपची एक जागा पाडण्यासाठी सत्तारांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती वरपर्यंत गेल्याने भाजपने सत्तारांना मंत्रिपद देण्यास प्रखर विरोध दर्शवला. त्यासाठी त्यांच्या असमाधानकारक कामगिरीला पुढे करण्यात आले. वादग्रस्त वक्तव्ये, न्यायालयीन केसेस ही कारणेही पुढे करण्यात आली. वास्तवात ज्यांना मंत्री करण्यात आले, त्यातील बहुतांश वाचाळवीर आहेत, एवढेच नाहीतर अनेकांविरुद्ध केसेसही सुरू आहेत. अशात केवळ सत्तारांनाच डावलण्यामागे जालन्यात नको त्याचे ‘कल्याण’ करण्याची त्यांची कामगिरीच असल्याचे स्पष्ट आहे.
भाजप आणि सत्तारांच्या या संघर्षात अचानक शिरसाट यांनी का उडी घेतली, हे कळायला मार्ग नाही. मात्र मंत्री झाल्यापासून सातत्याने त्यांची वक्तव्ये लक्षात घेतली तर सत्तार आणि त्यांच्यात मंत्रिपदावरून बिनसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मंत्रिपदाची शपथ घेताच शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना डिवचल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यातील गुंडगिरी संपवणार असून, त्याची सुरुवात सिल्लोडमधून करणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तत्कालीन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी २०२४ च्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीचे नियोजन केले. त्यामध्ये ६५० कोटींपैकी ५०८ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली होती. या नियोजनावरही शिरसाट यांनी प्रश्नचिन्ह निर्माण करत जिल्हा नियोजन समितीचे नियोजन चुकले असून त्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सत्तारांच्या शक्तीप्रदर्शनावरही खोचक टिप्पणी…
अब्दुल सत्तार यांचा १ जानेवारीला वाढदिवस असून, यानिमित्ताने त्यांचे भव्य स्वागत करण्याचे नियोजन मित्रमंडळाने केले आहे. शनिवारी (२१ डिसेंबर) यासंदर्भात मराठा लॉन्समध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची पूर्वतयारी बैठकही पार पडली. या वेळी उपस्थितांनी सत्तार यांना मंत्रिपद मिळाले नसल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली. मंत्रिपदापासून डावलल्याने अब्दुल सत्तार हे वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे मंत्रिपद मिळाल्यामुळे संजय शिरसाट यांचे जंगी स्वागत झाल्यामुळे सत्तार समर्थकांचा तीळपापड झाल्याचे दिसून येत असून, शक्तिप्रदर्शन करून दबावाचे राजकारण यानिमित्ताने खेळले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे सैनिक आलेले असल्याने शिंदे गटावर वेगळाच दबाव सत्तार आणत तर नाही ना, असेही बोलले जात आहे. राजेंद्र राठोड, दिनेश परदेशी यांची उपस्थिती होती. अब्दुल सत्तार हे आमचे जुने सहकारी व सर्वपक्षीय बैठक असल्याने मी सहभागी झालो, असे स्पष्टीकरण राजेंद्र राठोड यांनी दिले. या वेळी माजी जिल्हा परिषद सभापती किशोर बलांडे यांनी साधारण एक लाख लोक सत्तार यांच्या स्वागत कार्यक्रमाला आणण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती दिली. मराठवाडा सांस्कृतिक मैदानासह इतरही मैदानांची चाचपणी करत आहोत, असे ते म्हणाले. सत्तारांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे ते जो काही निर्णय घेतील, आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नक्की सत्तारांच्या मनात चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्तारांच्या शक्तीप्रदर्शनाबद्दल मंत्री शिरसाट यांना विचारले असता त्यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की ‘देव त्यांचे भले करो’!
शिरसाट यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत…
कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर संजय शिरसाट शनिवारी सायंकाळी समृद्धी महामार्गावरून शहरात आले. त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हर्सूल टी पॉइंटपासून कोकणवाडीतील त्यांच्या कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी आतषबाजी झाली. क्रेनवर लावलेला मोठा पुष्पहार घालून आणि जेसीबीने फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. हर्सूल टी- पॉइंट, आंबेडकरनगर, जळगाव टी-पॉइंट येथील वसंतराव नाईक पुतळ्याजवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतषबाजी करत तसेच मोठा पुष्पहार घालून शिरसाट यांचे सपत्नीक स्वागत केले. बंजारा समाजाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लेंगी नृत्य केले. लेझीम पथकही होते. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, रमेश पवार, माजी महापौर विकास जैन, विजय वाघचौरे आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मोंढा नाका, शासकीय दूध डेअरी चौक, क्रांती चौक, उस्मानपुरा चौक आणि कोकणवाडी चौकातही स्वागत करण्यात आले.
शिरसाट म्हणाले, जिथे लाठ्याकाठ्या खाल्ल्या, त्याच ठिकाणी सत्कार, मोठा आनंद…
क्रांती चौकात सातत्याने आंदोलने केली. इथेच मी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. मात्र त्याच ठिकाणी होणारा माझा सत्कार हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदी दिवस असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. शिरसाट म्हणाले, की माझ्या आयुष्यातील माझ्या कामाचे फळ मिळाले. क्रांती चौकात माझा सत्कार-स्वागत हा माझ्या आयुष्यातील मोठा आनंद आहे. कार्यकर्ते, शिवसैनिक यात सहभागी झाले. मला जी संधी मिळाली, तिचा फायदा मी शहराच्या विकासासाठी करणार आहे, असे ते म्हणाले.