छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : नायलॉन मांजा शहरवासियांच्या जिवावर बेतू लागला आहे. कामावर निघालेल्या इलेक्ट्रिशियन तरुणाचा गळा नायलॉन मांजाने १० सेंमीपर्यंत चिरला गेला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (२१ डिसेंबर) सकाळी शहानूरमियाँ दर्ग्याजवळ घडली. तरुणावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीड तास शस्त्रक्रिया करून गळ्याला १६ टाके घालण्यात आले आहेत. त्याला बोलणेही अवघड जात असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
पांडुरंग कांतीलाल पाटकुले (वय ३०, रा. कैलासनगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ते दुचाकीवरून त्रिमूर्ती चौक परिसरातील कामावर निघाले होते. शहानूरमियाँ दर्गा चौकाजवळ अचानक त्यांच्या गळ्यात मांजा अडकला. काही कळण्याच्या आतच गळा चिरला गेला. प्रसंगावधान राखून त्यांनी एका हाताने गळ्यावरील जखम दाबून धरली व दुसऱ्या हाताने दुचाकी चालवत हेडगेवार रुग्णालय गाठले. तोपर्यंत बराच रक्तस्त्राव झाला होता. शर्ट व दुचाकी रक्ताने माखली होती.
डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू केले. मकरसंक्रांतीचा सण जवळ आल्यावर आकाशात अशी पतंगबाजी सुरू होते. यात आता सर्रास नायलॉन मांजा वापरला जात असल्याने पक्षी जखमी होण्यासोबतच आता माणसेही जखमी होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नायलॉन मांजावर बंदी असूनही तो सर्रास विक्री होताना दिसत आहे. दरम्यान, या घटनांवर चिंता व्यक्त घाटी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी नागरिकांना सल्ला दिला आहे, की नागरिकांनी मांजापासून सावध राहावे. हेल्मेट, मानेचा बेल्ट वापरावा. जाड कपडे परिधान करावेत. त्यामुळे मांजापासून संरक्षण होईल.
कारवाई करा नसता रस्त्यावर उतरू…
लहान मुलांना नायलॉन मांजा लगेच भेटतो. पण प्रशासनाला भेटत नाही. आज माझ्या भावाच्या जिवावर बेतले आहे, उद्या शहरातील कोणत्याही नागरिकाच्या जिवावर बेतू शकते. प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजपचे पदाधिकारी निखिल महाले यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
…तर थेट अटक होणार, पोलीस आयुक्तांचा गंभीर इशारा
नायलॉन मांजाची विक्री करताना कोणी आढळल्यास गुन्हा दाखल करून थेट अटक करण्यात येईल, असा दम पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी पतंग विक्रेत्यांना भरला आहे. नायलॉन म्हणजेच चायनीज मांजाला घातक काच लावलेली असल्याने अनेक जण गंभीर जखमी होतात. गेल्या दोन महिन्यांमध्ये शहरात सहा नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात शहरातील सर्व पतंग विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. यापुढे सातत्याने पतंग विक्रेत्यांचे गोडावून व दुकानांची तपासणी केली जाणार असून, पोलीस कधीही छापे टाकतील.
कुठेही नायलॉन मांजा आढळला तर चौकशी केली जाईल. गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल करून अटक केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला. मांजा विक्री व वापराच्या विरोधात पोलिसांनी तयार केलेले पोस्टर प्रत्येक विक्रेत्याला दुकानात लावण्याची सूचना करण्यात आली आहे. कुठेही मांजा विक्री व वापर आढळल्यास सामान्य नागरिकांनी गुन्हे शाखेच्या निरीक्षकांच्या संपर्क क्रमांक ९२२६५१४०१४ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. या वेळी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हे शाखा निरीक्षक संदीप गुरमे, विशेष शाखा निरीक्षक अविनाश आघाव उपस्थित होते.