छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : राज्यभर गाजत असलेल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करत असल्याचे जाहीर केल्यानंतर, त्यांच्या जागी छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारगळ यांची कुठे बदली केली, हे अद्याप समोर आलेले नाही.
अविनाश बारगळ यांनी ७ ऑगस्ट २०२४ रोजी बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची कारकिर्द उल्लेखनीय राहिली. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडत गेल्यानंतर पोलिसांनी राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप होत आहे. याचदरम्यान केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली. जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्था बिघडत असल्याची परिस्थिती पाहून हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारगळ यांची बदली करत असल्याची घोषणा केली. आता नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यासमोर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान असून, छत्रपती संभाजीनगर शहरात त्यांनी ज्या पद्धतीने गुन्हेगारीचा बिमोड करण्याचे आव्हान पेलले, ते पाहता बीडमध्येही ते कायदा-सुव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. श्री. काँवत हे २०२७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून, त्यांनी राज्यात विविध ठिकाणी काम केले आहे.