छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : ७० वर्षीय वृद्धेला दुचाकीवर बसवून निर्मनुष्य जागी नेत भामट्याने गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र लुटून नेले. ही धक्कादायक घटना गुरुवारी (१९ डिसेंबर) दुपारी १२ च्या सुमारास गोलवाडी फाट्याजवळ घडली. तुमचे ज्येष्ठ नागरिक सहायता निधीमधील ६० हजार रुपये मंजूर झाल्याचे आमिष दाखवून लुटारूने त्यांना दुचाकीवर बसवले होते.
मंगला जीवन मोदी (वय ७०) कुटुंबीयांसह नारळीबागेत राहतात. गुरुवारी सकाळी त्या कर्णपुऱ्यातील मंदिरात दर्शनासाठी गेल्या. दर्शन घेतल्यानंतर पंचवटीच्या दिशेने पायी निघाल्या असता विठ्ठल-रुख्मिणी मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या भामट्याने आवाज देऊन थांबवले. तुमचा मुलगा नितीन माझ्या ओळखीचा आहे, असे तो म्हणाल्याने मंगला यांचा त्याच्यावर विश्वास बसला. तुमचे ज्येष्ठ नागरिक सहायता निधीचे ६० हजार रुपये आले असून, ती रक्कम तुम्हाला घेऊन देतो, अशी थाप मारली. त्यांना स्वतःच्या दुचाकीवर बसवून त्याने गोलवाडी फाट्याजवळ निर्मनुष्य परिसरात नेले. तिथे गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र पर्समध्ये ठेवण्यास सांगितले. ती पर्स बाजूला ठेवण्याचे नाटक करत त्याने दुचाकीवर बसून पळ काढला. फसवणूक झाल्याचे मंगला यांच्या लक्षात आले. लुटारूला मंगला यांच्या मुलाचे नाव कसे माहीत हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
मंदिरात दर्शनाच्या गर्दीत डाव साधला…
प्रियांका संजय चव्हाण (वय ३३, रा. सिडको एन-५) या संकष्टी चतुर्थी असल्याने मैत्रीण आणि मुलीसह बुधवारी (१८ डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास सिडको एन-१ भागातील गणपती मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनासाठी गर्दी होती. चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत प्रियांका यांच्या गळ्यातील ९५ हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. काही वेळाने हा प्रकार त्यांच्या मुलीच्या लक्षात आला. प्रियांका यांच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार जहीर शेख करत आहेत.